Zomato share price: झोमॅटोच्या शेअरमध्ये आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. सलग पाचव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. या काळात हा शेअर ११ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. कंपनीचा शेअर आज म्हणजेच मंगळवारी कामकाजादरम्यान २०० रुपयांच्या खाली घसरला होता.
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा शेअर बीएसईवर २०६.९५ रुपयांच्या पातळीवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून १९९.७५ रुपयांवर आला. मात्र, यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित सुधारणा दिसून आली. ज्यामुळे कंपनीचा शेअर दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी २०६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.
झोमॅटोचं नाव बदलणार
कंपनीनं सोमवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार शेअरहोल्डर्सनी इटरनल नावाला मान्यता दिली. कंपनीचं हे नवं नाव कॉर्पोरेटसाठी वापरलं जाणार आहे. मात्र याचा परिणाम झोमॅटोच्या अॅप आणि ब्रँडवर होणार नाही.
डिसेंबर तिमाहीत कामगिरी कशी?
वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ५७ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ५९ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत झोमॅटोचा निव्वळ नफा १७६ कोटी रुपये होता. तिमाही आधारावर झोमॅटोचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत ६६.५ टक्क्यांनी घसरला.
कंपनीच्या नफ्यात घट होण्यामागचे कारण ब्लिंकिटसारख्या प्लॅटफॉर्मवरील खर्चात झालेली वाढ आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल ६४.९० टक्क्यांनी वाढून ५४०५ कोटी रुपये झाला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)