Zen Technologies Ltd. : अस्थिर शेअर बाजारातही काही स्टॉक्सने मल्टीबॅगर परतावा दिला. अशाच एका संरक्षण कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे. संरक्षण मंत्रालयाने नुकतीच कंपनीला १०८ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर दिली आहे. या बातमीमुळे बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बुधवारच्या बाजारात शेअर १.०८% च्या वाढीसह १,३९७.३० रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता.
टँक क्रू ट्रेनिंग सिम्युलेटरची ऑर्डर
झेन टेक्नॉलॉजीजला टँक क्रू गनरी ट्रेनिंग सिम्युलेटर बनवण्याचे हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. हे सिम्युलेटर उच्च गुणवत्तेचे असतील. यामुळे कमांडर आणि गनर टँकच्या आतील तोफा चालवण्याच्या भागामध्ये वास्तविक ट्रेनिंग घेऊ शकतील. यामुळे सैनिकांना कोणताही धोका न पत्करता आणि खर्या टँकवर खर्च न करता उत्कृष्ट प्रशिक्षण घेता येईल. मंत्रालयाने पूर्ण काम करण्यासाठी २४ महिन्यांची (२ वर्षे) मुदत दिली आहे. परंतु, कंपनी हे काम एका वर्षातच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे भारतीय सैन्याला लवकर फायदा होईल. हा ऑर्डर स्वदेशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देणाऱ्या नवीन नियमांमुळे मिळाली आहे.
ॲन्टी-ड्रोन सिस्टिमसाठी २८९ कोटींचे काम
या ऑर्डरपूर्वी झेन टेक्नॉलॉजीजला संरक्षण मंत्रालयाकडून एकूण २८९ कोटी रुपयांचे दोन मोठे ऑर्डर मिळाले आहेत. हे दोन्ही ऑर्डर कंपनीच्या अँटी-ड्रोन सिस्टिम्सना अधिक चांगल्या प्रकारे अपग्रेड करण्यासाठी आहेत. ड्रोनचा धोका वेगाने बदलत असल्यामुळे, ऑपरेशन सिंदूर आणि इतर फ्रंटलाइन मिशनदरम्यान सैन्याकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मजबूत करणे तातडीचे झाले आहे.
कंपनीची नवीन घडामोड
कंपनीने २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फाइलिंगनुसार, झेन टेक्नॉलॉजीजने अनावेव सिस्टिम्स अँड सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ७६% इक्विटी हिस्सा ७ कोटी रुपये रोख देऊन विकत घेतला आहे. यामुळे ASSPL आता झेन टेक्नॉलॉजीजची उपकंपनी बनली आहे.
सप्टेंबर २०२५ तिमाहीचे निकाल
बिजनेस लाइनच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२५ (दुसरी तिमाही) मध्ये कंपनीच्या निकालांमध्ये काही चढ-उतार दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा ५.२२% ने कमी होऊन ५९.४० कोटी रुपये राहिला (मागील वर्षी ६२.६७ कोटी रुपये होता). विक्री २८.२३% च्या मोठ्या घसरणीसह १७३.५७ कोटी रुपये झाली (मागील वर्षी २४१.८४ कोटी रुपये होती). सकारात्मक बाब म्हणजे, कंपनीचा ऑपरेशनल नफा १.७७% ने वाढून ९०.०५ कोटी रुपये झाला आहे. २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कंपनीचे एकूण बाजार मूल्य NSE वर १२,६२१.६९ कोटी रुपये आहे.
वाचा - घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड! ई-केवायसी देखील होईल चुटकीसरशी, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,६२७.९५ रुपये होता, जो २४ डिसेंबर २०२४ रोजी पोहोचला होता. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याचा ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला गेला. या दिवशी शेअरने ९४६ रुपयांची पातळी गाठली होती.
