SEBI New Chief : गेल्या वर्षी शेअर बाजार नियामक सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधबी पुरी बुच यांचं नाव सातत्याने चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी दुकान बंद केलेली हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने माधबी पुरी बुच यांच्यावर वादग्रस्त आरोप केले होते. बुच यांनी विशिष्ट लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. मात्र, सरकारने त्यांना क्लिन चीट दिली. मात्र, आता त्यांना नारळ देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुच यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपत आहे. अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नवीन अध्यक्षांसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.
कसा होता माधवी पुरी बुच यांचा कार्यकाळ?
विद्यमान सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी २ मार्च २०२२ रोजी ३ वर्षांच्या कालावधीसाठी सेबी प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यान, माधवी पुरी बुच यांच्या कार्यकाळात अनेक वाद निर्माण झाले होते. माधबी पुरी बुच या एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या ५ वर्षांसाठी सेबीच्या पूर्णवेळ सदस्या होत्या.
माधवी पुरी बुच यांचा वादग्रस्त कार्यकाळ
माधवी पुरी बुच यांचा सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ अनेक वादांनी घेरला गेला आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने बुच यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. गेल्या वर्षी माधबी पुरी बुच यांच्यावर अदानी समूहाशी संबंधित ऑफशोअर फंडात गुंतवणूक करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात सेबीच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सेबीच्या मुख्यालयात आंदोलनही केले होते.
सेबीच्या अध्यक्षांना किती पगार आणि सुविधा मिळतात?
वित्त राज्य मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागाने सेबीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागवले आहेत. ही नियुक्ती कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ५ वर्षांचा कालावधी किंवा नियुक्ती ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत असते. यापूर्वीच माधवी यांना मुदतवाढ देण्यात आली होती. जाहिरातीनुसार, सेबीचे नवीन अध्यक्ष भारत सरकारच्या सचिवाप्रमाणे पगार निवडू शकतात किंवा प्रति महिना ५,६२,५०० रुपये एकत्रित पगाराचा पर्याय निवडू शकतात. पण, या पर्यायामध्ये निवासस्थान आणि कारची सुविधा दिली जात नाही.