Telecom Sector : एकेकाळी देशातील दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलला एकहाती टक्कर देणारी प्रमुख खासगी कंपनी म्हणून ज्या कंपनीची ओळख होती, ती वोडाफोन-आयडिया आज मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. कंपनीवर सध्या २ लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. याची गोष्ट सुरू होते १९९४ सालापासून. हचिन्सन एस्सारने १९९४ मध्ये भारतात दूरसंचार सेवा सुरू केली. २००७ मध्ये व्होडाफोन ग्रुपने ती विकत घेतली, त्यानंतर हे नाव व्होडाफोन-एस्सार लिमिटेड असे बदलण्यात आले. त्यावेळी, बीएसएनएल नंतर, बहुतेक लोक या कंपनीकडून सेवा घेत होते. नंतर, आयडिया आणि व्होडाफोनचे विलीनीकरण झाले, ज्यामुळे व्होडाफोन-आयडिया ही एक नवीन कंपनी तयार झाली, जी आजही सेवा प्रदान करते. पण, आज कंपनी भयानक आर्थिक संकटात सापडली असून यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहे.
सरकार आणि बँकांकडून मदतीची अपेक्षा
कर्जबाजारी वोडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत किशोर यांनी सांगितले की, कंपनी सरकारसोबत मिळून काम करत आहे. ७८,५०० कोटी रुपयांच्या AGR थकबाकीसाठी दीर्घकालीन तोडगा निघेल, अशी त्यांना आशा आहे. दीर्घकालीन निधी उभारणीसाठी कंपनी बँका आणि गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संपर्क साधत आहे. मात्र, हा निधी उभारणीचा निर्णय देखील AGR प्रकरणाच्या अंतिम तोडग्यावर अवलंबून आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आर्थिक वर्ष २०१६-१७ पर्यंतच्या अतिरिक्त AGR मागणीवर पुनर्विचार करण्याची आणि व्याज व दंड यासह सर्व AGR थकबाकीचे पुनर्मूल्यांकन करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीवरील कर्जाचा डोंगर
| कर्जाचा प्रकार | देय रक्कम (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) |
| समायोजित सकल महसूल (AGR) थकबाकी | ७८,५०० कोटी |
| बँकांचे थकीत कर्ज (व्याज वगळता) | १५.४२ कोटी |
| स्पेक्ट्रम देयता (२०४३-४४ पर्यंत) | २,०१,४०९ कोटी (एकूण) |
कंपनीवरील स्पेक्ट्रम आणि AGR ची एकूण देयता (व्याज वगळता) *२,०१,४०९ कोटी रुपये इतकी आहे, जी २०२६ ते २०४४ पर्यंतच्या वर्षांत देय आहे.
वाचा - निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
कंपनीला हजारों कोटींचा तोटा
आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) व्हीआयएलला १२,१३२ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीची निव्वळ मालमत्ता (नेट वर्थ) नकारात्मक ८२,४६० कोटी रुपये इतकी होती. याचा स्पष्ट अर्थ असा की, कंपनीवरील थकीत रक्कम आणि कर्ज हे कंपनीच्या सध्याच्या बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे. २००७ मध्ये 'हचिंसन एस्सार'ला वोडाफोन समूहाने विकत घेतल्यानंतर, आज 'वोडा-आयडिया'समोर अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
