Share Market Today: जागतिक बाजारातून आलेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी घसरणीसह सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख बेंचमार्क इंडेक्स रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. बाजार उघडताच सेन्सेक्स २३० अंकांनी खाली आला, तर निफ्टी ६० अंकांनी घसरून २५,९८० च्या आसपास व्यवहार करत होता. बँक निफ्टी मध्येही ८० अंकांची घसरण नोंदवण्यात आली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर फार्मा, एफएमसीजी, मेटल, आयटी, एनबीएफसी, आणि प्रायव्हेट बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. याउलट, रियल्टी, ऑटो, मीडिया आणि पीएसयू बँक क्षेत्रातील शेअर्स थोडीशी वाढीसह व्यवहार करत होते.
निफ्टी ५० मध्ये समाविष्ट असलेल्या ५० शेअर्सपैकी केवळ १२ शेअर्समध्ये वाढ दिसून आली. एल अँड टी (LT), श्रीराम फायनान्स (Shriram Finance), अदानी एंटरप्रायजेस (Adani Enterprises), इंडिगो (Indigo), जिओ फिन (Jio Fin), आणि टीएमपीव्ही (TMPV) या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, डॉ. रेड्डीज (Dr Reddy's), सन फार्मा (Sun Pharma), भारती एअरटेल (Bharti Airtel), एचडीएफसी लाईफ (HDFC Life), मॅक्स हेल्थ (Max Health), आणि ग्रासिम (GRASIM) हे शेअर्स सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्सपैकी होते.
बाजार उघडताना, सेन्सेक्स कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत २४७ अंकांनी खाली ८४,७५० वर, निफ्टी ६९ अंकांनी खाली २५,९८४ वर आणि बँक निफ्टी २३३ अंकांनी खाली ५८,१५२ वर उघडला. चलन बाजारात रुपया २१ पैशांनी कमकुवत होऊन ८८.३८/डॉलर च्या पातळीवर उघडला.
फेडरल रिझर्व्हचा निर्णय
सकाळच्या सत्रात जागतिक बाजारातून थोडे संमिश्र संकेत होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं अपेक्षेनुसार व्याजदरात ०.२५% (पाव टक्का) कपात केली, ज्यामुळे दर आता ३.७५%-४.००% च्या कक्षेत आले आहेत. मात्र, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पुढील बैठकीत आणखी दर कपातीची शक्यता कमी असल्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहावर थोडा विरजण पडलं.
फेडने त्याचबरोबर डिसेंबर महिन्यापासून लिक्विडिटी टाइटनिंग (बॉन्ड विक्री कार्यक्रम) बंद करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे सिस्टीममध्ये रोख (कॅश फ्लो) वाढण्यास मदत होईल. या घोषणेमुळे सुरुवातीच्या सत्रात अमेरिकेच्या बाजारात मोठी वाढ झाली, परंतु दिवसअखेर मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाला. अमेरिकन बाजाराने इंट्रा-डे मध्ये उच्चांक गाठला, पण तिथून तो घसरला. डाऊ जोन्स इंट्रा-डे मध्ये नवीन लाइफ हायवरून सुमारे ४०० अंकांनी घसरून अखेर ७५ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. याउलट, नॅस्डॅक १३० अंकांनी वाढून आपल्या सर्वकालीन उच्च स्तरावर बंद झाला आणि एस अँड पी ५०० नेही नवा शिखर गाठला, पण दिवसअखेर सपाट स्तरावर बंद झाला.
