Top Index Fund : शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सध्या गुंतवणुकदारांचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरत आहे. सरासरी १२ ते १४ टक्के परतावा देण्याची क्षमता असलेल्या या क्षेत्रात सध्या 'इंडेक्स फंड' गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता, काही इंडेक्स फंडांनी चक्क ३६ टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या ३ वर्षांतील 'टॉप परफॉर्मिंग' इंडेक्स फंड
- मोतीलाल ओसवाल इनहॅन्स्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड : ३६.५१% परतावा (NAV: ₹३६.५१)
- ICICI प्रू NASDAQ 100 इंडेक्स फंड : ३०.८०% परतावा (NAV: ₹३०.६०)
- ICICI प्रू निफ्टी ऑटो इंडेक्स फंड : २८.६२% परतावा (NAV: ₹२२.३६)
- ॲक्सिस निफ्टी मिडकॅप 50 इंडेक्स फंड : २५.१७% परतावा (NAV: ₹२०.५६)
- एडलवाइज निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 इंडेक्स फंड : २४.९५% परतावा (NAV: ₹१८.३३)
कोणत्या फंडात कोणते शेअर्स?
हे फंड नक्की कुठे गुंतवणूक करतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
१. मोतीलाल ओसवाल इनहॅन्स्ड व्हॅल्यू : या फंडात प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (९.३३%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (९.१७%), ओएनजीसी आणि बीपीसीएल यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
२. ICICI प्रू NASDAQ 100 : हा फंड अमेरिकन बाजारातील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. यात एनव्हीडिया (८.८७%), अॅपल (७.३२%), अॅमेझॉन आणि फेसबुक यांसारख्या दिग्गज कंपन्या आहेत.
३. ICICI प्रू निफ्टी ऑटो : वाहन क्षेत्रातील महिंद्रा अँड महिंद्रा (२५.६७%), मारुती सुझुकी (१६.०५%) आणि बजाज ऑटो या शेअर्समध्ये यांची मोठी होल्डिंग आहे.
४. ॲक्सिस निफ्टी मिडकॅप 50: यात BSE (५.६४%), हिरो मोटोकॉर्प, फेडरल बँक आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स यांचा समावेश आहे.
वाचा - ५९० कोटींच्या 'झोल'मुळे IDFC First Bank चे शेअर्स धडाम! सरकारी खात्यातूनच पैशांची पळवापळवी
इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय?
इंडेक्स फंड हा गुंतवणुकीचा असा प्रकार आहे जो एखाद्या विशिष्ट निर्देशांकाची जशीच्या तशी 'नकल' करतो. जर तुम्ही निफ्टी ५० इंडेक्स फंडात गुंतवणूक केली, तर तुमचे पैसे निफ्टीमधील ५० कंपन्यांमध्ये त्याच प्रमाणात गुंतवले जातात ज्या प्रमाणात त्या इंडेक्समध्ये आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेन्सेक्स (टॉप ३० शेअर्स), निफ्टी बँक किंवा सेक्टर स्पेसिफिक (उदा. ऑटो किंवा आयटी) इंडेक्स फंड निवडू शकता. यामध्ये फंड मॅनेजरला स्वतःचे डोकं न लावता केवळ इंडेक्स फॉलो करायचा असतो, त्यामुळे याचे चार्जेस इतर फंडांच्या तुलनेत कमी असतात.
