TCS Market Cap : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने घसरत आहे. बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आणि त्याने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला. याचा थेट आणि मोठा फायदा भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सना झाला. रुपया कमजोर झाल्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्समध्ये मोठी तेजी दिसून आली. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये तर अडीच टक्क्यांची (२.५%) जबरदस्त वाढ झाली. या तेजीमुळे कंपनीच्या एकूण मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये सुमारे २८,००० कोटी रुपयांची भर पडली आहे.
टीसीएसच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
दिवसभराच्या व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर २.४४ टक्क्यांच्या वाढीसह ३,२१२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी टीसीएसचा शेअर १.२७ टक्क्यांच्या तेजीसह ३,१७५.५० रुपयांवर व्यवहार करत होता. मंगळवारी (२ डिसेंबर) ३,१३५.६० रुपयांवर बंद झालेला हा शेअर आज ३,१५० रुपयांवर उघडला.
कंपनीला एका दिवसात २७,६४२ कोटींचा फायदा
रुपयाची कमजोरी टीसीएससारख्या आयटी कंपन्यांसाठी कशी वरदान ठरली, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मंगळवारी बाजार बंद झाल्यावर कंपनीचे मार्केट कॅप ११,३४,४८७.५३ कोटी रुपये होते. बुधवारच्या व्यवहारादरम्यान ते वाढून ११,६२,१२९.७२ कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ, कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूएशनमध्ये एका दिवसात २७,६४२ कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली.
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर का?
विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी सततची नफावसुली आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे रुपया ९० रुपयांचा टप्पा ओलांडून आपल्या लाइफ टाइम लोअर लेव्हलवर उघडला. डॉलरच्या तुलनेत रुपया ८९.९६ वर उघडला आणि दुपारपर्यंत ९०.२५ वर पोहोचला. सीआर फॉरेक्स ॲडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबारी यांनी सांगितले की, USD/INR चा दर ८८.९० ते ९०.२० च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ८९ च्या खाली स्पष्ट ब्रेकआउट मिळाल्यासच रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे.
वाचा - व्लादिमीर पुतिन यांचा दिल्लीत शाही मुक्काम! 'चाणक्य सुट'चे एका रात्रीचं भाडं म्हणजे वर्षाचं पॅकेज
आयटी कंपन्यांचा महसूल मुख्यतः डॉलरमध्ये येतो. रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाल्यावर, त्यांना मिळणाऱ्या डॉलरचे रूपांतर रुपयात केल्यास मोठा नफा होतो. याच कारणामुळे TCS आणि इतर IT शेअर्समध्ये आज मोठी तेजी दिसून आली.
