Tata Share: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव दिसून येतोय. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही टाटा समूहाच्या एका शेअरने प्रवाहाविरुद्ध जात जबरदस्त तेजी दाखवली आहे. टाटा समूहाची कंपनी ‘तेजस नेटवर्क्स’ या शेअरने अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांत गुंतवणूकदारांना सुमारे ६० टक्क्यांचा रिटर्न दिला असून, सोमवारीही या शेअरमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
बाजार दबावात, मात्र तेजस नेटवर्क्स तेजीत
गेल्या काही दिवसांपासून तेजस नेटवर्क्सच्या शेअरमध्ये प्रत्येक सत्रात १५ टक्क्यांच्या आसपास किंवा त्याहून अधिक वाढ होताना दिसत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचा ताण आणि जागतिक अनिश्चिततेचा या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. आज(दि.२) तेजस नेटवर्क्सचा शेअर १३ टक्क्यांनी वाढून ४९२ रुपये प्रति शेअरवर पोहोचला. शुक्रवारीही बाजारात मोठी घसरण असताना, या शेअरमध्ये १७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली होती. त्याआधीच्या दिवशीदेखील सुमारे १५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती.
तीन दिवसांत ६०% झेप
तेजस नेटवर्क्सच्या शेअरने अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांत ३१५ रुपयांवरून ४९० रुपयांच्या पुढे झेप घेतली आहे. ही वाढ सुमारे ५८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, या शेअरने एका आठवड्यात सुमारे ५०%, एका महिन्यात ४२%, तर एका वर्षात ३१% परतावा दिला आहे. तसेच, शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २९४ रुपये, तर 52 आठवड्यांचा उच्चांक ९१४ रुपये आहे.
शेअरमध्ये अचानक तेजी का?
या जबरदस्त तेजीमागे कंपनीचा एक महत्त्वाचा निर्णय कारणीभूत ठरला आहे. तेजस नेटवर्क्सने जपानच्या NEC कॉर्पोरेशनसोबत 5G मॅसिव्ह MIMO रेडिओच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी करार केल्याची घोषणा केली आहे.
5G मॅसिव्ह MIMO म्हणजे काय?
5G मॅसिव्ह MIMO (Multiple Input Multiple Output) ही उच्च क्षमतेची बेस स्टेशन अँटेना तंत्रज्ञान प्रणाली आहे. यामध्ये डझनावधी किंवा शेकडो अँटेना एलिमेंट्सचा वापर होतो. यामुळे जास्त वेग आणि स्थिर नेटवर्क मिळते. यामुळे नेटवर्क क्षमता वाढते आणि ग्राहकांना अधिक वेगवान व दर्जेदार सेवा मिळते. या महत्त्वाच्या करारामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असून, शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून येत आहे.
(विशेष सूचना- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
