Suzlon Energy Ltd : मंगळवारी शेअर बाजारात मोठा चढ-उतार दिसून आला. परंतु, याच दरम्यान पवन ऊर्जा क्षेत्रातील स्टॉक सुजलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये जवळपास एका महिन्यानंतर जोरदार तेजी नोंदवली गेली. स्टॉक ५% च्या वाढीसह ५६.४० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल ७७.१२ हजार कोटी रुपये आहे.
बाजारात निफ्टी ५० ने २६,००० चा टप्पा एकदा ओलांडला होता. परंतु, २६,०४६ च्या स्तरावरून नफावसुली झाल्याने इंडेक्स खाली आला. मात्र, या अस्थिरतेमध्ये सुझलॉनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले गेले, ज्यामुळे स्टॉकला चांगली झेप मिळाली.
तिमाही निकालांपूर्वी तेजी का?
सुजलॉन एनर्जी लवकरच आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. निकालांपूर्वी स्टॉकला मिळालेल्या या तेजीमागे अनेक सकारात्मक कारणे आहेत.
- कर्जमुक्त कंपनी: कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपली आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे आणि आता ती जवळपास कर्जमुक्त कंपनी बनली आहे. कर्जाचा बोजा कमी झाल्याने आगामी तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
- उत्कृष्ट रिटर्न टू इक्विटी : सुझलॉनचा रिटर्न टू इक्विटी सध्या ४१.४% आहे, जो आर्थिक दृष्ट्या खूप चांगला मानला जातो. हे दर्शवते की कंपनी आपल्या भागधारकांच्या पैशाचा प्रभावीपणे वापर करत आहे.
- मजबूत ऑर्डर बुक: सुझलॉन एनर्जीची ऑर्डर बुक सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबरपर्यंत, ही ५.७ गीगावॉटवरून वाढून सुमारे ६.५ गीगावॉट पर्यंत पोहोचली आहे. कंपनीला नुकतेच टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी आणि इतर मोठ्या ग्राहकांकडून महत्त्वाचे ऑर्डर्स मिळाले आहेत.
ऑर्डर बुकची ही मजबुती पुढील २.५ ते ३ वर्षांसाठी कंपनीच्या उत्पन्नाची मजबूत शक्यता सुनिश्चित करते.
दुसऱ्या मल्टीबॅगरची फेरी येणार?
गेल्या पाच वर्षांत, सुझलॉनच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना १६००% मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक ५० ते ६० रुपयांच्या दरम्यान एका रेंजमध्येच व्यवहार करत आहे आणि सध्या कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे.
बाजारातील तज्ञांचे मत आहे की, अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल किंवा कोणताही मोठा नवीन ऑर्डर आल्याशिवाय स्टॉकला मोठी गती मिळणार नाही.
वाचा - Gold Loan नंतर आता Silver Loan! कर्ज घेणाऱ्यांसाठी आरबीआयने उघडला नवा पर्याय, काय आहेत नियम?
सध्या, स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७४.३० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांक ४६.१५ रुपये आहे. ऑर्डर बुकची मजबूती आणि कर्जमुक्त झाल्याची बातमी मल्टीबॅगर परताव्याच्या दुसऱ्या फेरीची आशा वाढवत आहे.
