Meesho Stock Price: ई-कॉमर्स मार्केटप्लेस मीशोच्या (Meesho) शेअर्समध्ये ९ मार्च रोजी १० टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. बीएसई (BSE) वर या शेअरची किंमत १४३.२० रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत खाली आली. या विक्रीच्या दबावामागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे कंपनीला मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी मिळालेली सुमारे १,५०० कोटी रुपयांची इन्कम टॅक्स डिमांड नोटीस (Income Tax Demand Notice) आणि दुसरं म्हणजे 'लॉक-इन पिरीयड' संपल्यामुळे २ टक्के इक्विटी व्यापारासाठी खुली होणं.
१,५०० कोटींच्या इन्कम टॅक्स नोटिसचं प्रकरण
कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या असेसमेंट युनिटनं 'इनकम टॅक्स ॲक्ट'च्या सेक्शन १५६ अंतर्गत ही मागणी नोटीस बजावली आहे. यासोबतच सेक्शन १४३(३) अंतर्गत असेसमेंट ऑर्डरही जारी करण्यात आली आहे. आयकर विभागानं व्याजासह एकूण १४,९९,७३,८२,८४० रुपये म्हणजेच सुमारे १५०० कोटी रुपयांच्या कराची मागणी केली आहे.
सावध राहा! तुम्हालाही आलाय का e-Pan डाऊनलोड करायचा ईमेल? अनावधानानंही करू नका 'ही' चूक
कंपनीनं स्पष्ट केलंय की, ते या असेसमेंट ऑर्डरमधील निरीक्षणांशी सहमत नाहीत आणि या मागणीला आव्हान देण्याची योजना आखत आहेत. कायद्याच्या आधारे आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा कंपनीनं केला असून, या ऑर्डरचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर किंवा कामकाजावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय.
पुन्हा एकदा प्राप्तिकर नोटिसीचा सामना
मीशोच्या मते, यापूर्वी मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी देखील अशीच मागणी नोटीस बजावण्यात आली होती. याबद्दलची सविस्तर माहिती कंपनीने ५ डिसेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने १७ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे त्या नोटिसीवर अंतरिम स्थगिती दिली होती आणि ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.
लॉक-इन कालावधी संपल्याचा परिणाम
सोमवारी मीशोचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर सुमारे १०.९९ कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी पात्र झाले आहेत. 'नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च'नुसार, शुक्रवारच्या बंद किंमतीच्या आधारावर या शेअर्सचं मूल्य १,८५७.३ कोटी रुपये आहे. शेअर्सचा लॉक-इन संपला याचा अर्थ असा नाही की हे सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, तर ते केवळ ट्रेडिंगसाठी पात्र झालेत.
कंपनीची वाटचाल आणि शेअरची स्थिती
विदित आत्रे आणि संजीव बरनवाल यांनी २०१५ मध्ये मीशोची सुरुवात केली होती. ही कंपनी डिसेंबर २०२५ मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. कंपनीचा ५,४२१.२० कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) ८१.७६ पट भरला होता. सध्या कंपनीचं मार्केट कॅप ६४,७०० कोटी रुपये असून, २०२६ मध्ये आतापर्यंत शेअर २१ टक्क्यांनी खाली आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये यूबीएसनं या शेअरसाठी २२० रुपये प्रति शेअर या टारगेट प्राईससह 'Buy' रेटिंग दिलं होतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
