Stock Market Today: देशाचा शेअर बाजार कामकाजाच्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी वाढीसह उघडला. या वेळेस प्रमुख भारतीय इक्विटी निर्देशांक बीएसई सेन्सेक्स (Sensex) आणि एनएसई निफ्टी (Nifty) दोन्ही तेजीत होते. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) चा ३० शेअर्सवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स ५२०.६१ अंकांनी (०.६२ टक्क्यांनी) वाढून ८४,९४६.९५ च्या पातळीवर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) ५० शेअर्सवर आधारित निर्देशांक निफ्टी १५०.३५ अंकांनी (०.५८ टक्क्यांनी) वाढून २६,०१८.९५ च्या पातळीवर उघडला.
सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ३४८ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १४१ शेअर्समध्ये घट झाली आणि ५८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमधील कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा, टायटन कंपनी, टीसीएस आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक फायद्यात राहिले. याउलट, मॅक्स हेल्थकेअर, मारुती सुझुकी आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह व्यवहार करत होते.
आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
भारतीय रुपया गुरुवारी सकाळी मागील बंदच्या तुलनेत १० पैशांनी मजबूत होऊन प्रति डॉलर ८७.८३ वर उघडला. तर, सोमवारी तो प्रति डॉलर ८७.९३ वर बंद झाला होता. याव्यतिरिक्त, दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक तासाच्या विशेष 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्रात भारतीय निर्देशांक वाढीसह उघडले होते. या सत्रात सेन्सेक्स २६७.०८ अंकांनी (०.३२ टक्क्यांनी) वर ८४,६३०.४५ च्या स्तरावर उघडला होता, तर निफ्टी ८०.९० अंकांनी (०.३१ टक्क्यांनी) वर २५,९२४.०५ च्या स्तरावर उघडला होता.
मुहूर्त ट्रेडिंग सत्रात भारतीय निर्देशांक उच्च स्तरावर बंद देखील झाले होते. या दरम्यान सेन्सेक्स ६२.९७ अंकांनी (०.०७ टक्क्यांनी) वर ८४,४२६.३४ वर होता, आणि निफ्टी २५.४५ अंकांनी (०.१० टक्क्यांनी) वधारुन २५,८६८.६० वर पोहोचला होता.