Stock Market Today: गुरुवारी म्हणजेच निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारांची सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी खूपच किरकोळ वाढीसह व्यवहार करत होते. निफ्टी २५,२०० च्या वर राहण्याचा प्रयत्न करत होता. शेअर बाजारात चढ उतार दिसून येत होता. एसबीआय, हिंडाल्को, आयशर मोटर्स सारख्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत होती. त्याच वेळी, रिअॅल्टी शेअर्स देखील चमकत होते.
कामकाजाच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ३५ अंकांनी घसरून ८२,५९९ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टीमध्ये ६ अंकांची थोडीशी घसरण झाली आणि तो २५,२०६ वर पोहोचला. बँक निफ्टी १०९ अंकांनी घसरल्यानंतर तो ५७,०६७ वर व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टीवर इंडसइंड बँक, आयशर मोटर्स, हिंडाल्को, सन फार्मा, ट्रेंट यांचे शेअर्स वधारले. त्याच वेळी, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ, इटर्नलमध्ये घसरण झाली.
दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. भारतासोबत करार करण्याच्या गोष्टी अगदी जवळ पोहोचल्या आहेत, असंही ते म्हणाले.
आज सकाळी गिफ्ट निफ्टी २५२५० च्या जवळ स्थिर होता. डाउ फ्युचर्स ५० अंकांनी खाली आला. सोनं ३३५० डॉलर्सच्या खाली होतं, चांदी ३८ डॉलर्सवर होती आणि कच्चं तेल ६९ डॉलर्सच्या जवळ स्थिर होतं. काल एफआयआयनी रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्समध्ये सुमारे ६,२०० कोटी रुपयांची विक्री केली होती. देशांतर्गत फंडांनी सलग आठव्या दिवशीही खरेदी सुरू ठेवत १,२०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.