Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजात सुरुवातीच्या व्यवहारात विक्री दिसून येत आहे. सेन्सेक्स ३६ अंकांनी घसरून ८२,५३४ वर उघडला. निफ्टी १ अंकांनी मजबूत होऊन २५,१९६ वर उघडला. बँक निफ्टी १०५ अंकांनी वाढून ५७,१११ वर उघडला. तर दुसरीकडे रुपया १७ पैशांनी कमकुवत होऊन ८५.९८/ डॉलर्सवर उघडला. ट्रम्प यांच्या विधानाचा आज फार्मा क्षेत्रावरही परिणाम झाला आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात फार्मा क्षेत्र लाल रंगात व्यापार करत असल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे, आज मेटल क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. आयटी क्षेत्र घसरणीत व्यापार सुरू केल्यानंतर लगेचच ग्रीन झोनमध्ये व्यापार करत असल्याचं दिसून आले. निफ्टी आयटी निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी वाढीसह व्यापार करत आहे.
कामकाजादरम्यान ट्रेंट, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इटर्नल आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.
अमेरिकन बाजारात संमिश्र कल
मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. नॅसडॅक आणि एस अँड पी ५०० सारख्या टेक हेवी इंडेक्सनं पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला, तर डाउ जोन्स मोठ्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील महागाईत वाढ, ज्यामुळे बाजारातील व्याजदरांबद्दल पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. दरम्यान, त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठांवरही दिसून येण्याची शक्यता आहे.