एलिटकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्सने सोमवारी कमकुवत बाजार असतानाही 5% चे अपर सर्किट गाठले आणि ₹90.20 वर लॉक झाला. ट्रेडिंग सत्रात व्यवहारामध्ये झालेल्या मोठ्या वाढीने ही तेजी दिसून आली. यापूर्वी कंपनीने सर्व पात्र नॉन-प्रमोटर शेअरधारकांना जाहीर केलेल्या इंटरिम लाभांशाची संपूर्ण रक्कम वितरित केल्याची माहिती एक्स्चेंजला दिली होती. हा लाभांश 5 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित करण्यात आला होता आणि 12 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट होती.
महत्वाचे म्हणजे, या शेअरने केवळ पाच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,664% चा बंपर परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, या शेअरने गेल्या एका वर्षातच तब्बल 1098% हून अधिकची वाढ नोंदवली आहे. लाभांश वितरणानंतरही कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सप्टेंबर तिमाहीअखेर प्रमोटर्सकडे 59.4% हिस्सेदारी असून FIIs कडे 38.2% हिस्सेदारी आहे. तर, उर्वरित 2.4% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे, सोमवारी तेजी दिसून आली असली तरी गत काही महिन्यांत शेअरमध्ये तीव्र घसरण झाली आहे. हा शेअर ऑगस्टमधील ₹422.65 च्या उच्चांकावरून सुमारे 78% कोसळला आहे. यामुळे सध्याची तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
एलिटकॉन इंटरनॅशनल तंबाखू उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीत कार्यरत आहे. तिचा व्यवसाय युएई, सिंगापूर, हाँगकाँग आणि यूकेसह अनेक युरोपीय देशांत पसरलेला आहे. तंबाखूसोबतच कंपनी मॅचेस, पाईप्स आणि स्मोकिंग अॅक्सेसरीजही तयार करते. अलीकडच्या काळात कंपनीने FMCG क्षेत्रात विस्तार करत पॅकेज्ड फूड, खाद्यतेल, पेये आणि कृषी-उत्पादनांच्या व्यवसायातही पाऊल टाकले आहे.
विस्ताराच्या योजनेला गती देण्यासाठी कंपनीने ₹300 कोटी उभारण्यासाठी QIP ची मंजुरी दिली आहे. हा निधी केवळ उच्च क्षमता असलेल्या FMCG कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी वापरला जाईल.
