Silver Price : सध्या कमॉडिटी बाजारात सोन्यापेक्षाही जास्त चमक 'चांदी'मध्ये पाहायला मिळत आहे. बाजारात सध्या चांदीच्या 'पांढऱ्या' वादळाचा जोर असून, मंगळवारी देशांतर्गत वायदा बाजारात चांदीने प्रथमच २.०७ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. औद्योगिक मागणीतील वाढ आणि जागतिक पुरवठ्यातील घट यामुळे चांदीने गुंतवणुकीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकले आहे.
२,०७,८३३ रुपयांचा उच्चांक
मंगळवारी रात्री उशिरा 'मल्टी कमॉडिटी एक्सचेंज'वर चांदीच्या किमती २,०७,८३३ रुपये प्रति किलो या 'लाईफ-टाईम हाय' स्तरावर पोहोचल्या. बाजार बंद होताना हे दर २,०७,४३५ रुपयांवर स्थिरावले. आज (गुरुवारी) सकाळी नफावसुलीमुळे दरात किरकोळ घसरण होऊन ते २,०६,९८२ रुपयांवर व्यवहार करत आहेत, जे विक्रमी स्तरापेक्षा ८५१ रुपयांनी कमी आहेत.
सोन्यापेक्षाही वेगवान परतावा!
बाजार तज्ज्ञ अजय बग्गा यांच्या मते, चांदीची कामगिरी सध्या सोन्यापेक्षा अधिक वेगवान आहे. जागतिक बाजारात चांदीचे भाव प्रथमच ६६ डॉलर्स प्रति औंसच्या पार गेले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा जेव्हा मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी तेजी येते, तेव्हा चांदीचा परतावा सोन्यापेक्षा सरस ठरतो. या वर्षात चांदीच्या किमतीत तब्बल ११० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
४० वर्षांनंतर कच्च्या तेलालाही टाकले मागे!
चांदीच्या या तेजीचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे ४० वर्षांत पहिल्यांदाच चांदीने कच्च्या तेलालाही मागे टाकले आहे. ६५ डॉलर्सचा टप्पा ओलांडून चांदीने हे सिद्ध केले आहे की, भविष्यात दुर्मिळ आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंचे महत्त्व वाढत जाणार आहे. १९७०-८० च्या दशकानंतर अशी स्थिती प्रथमच पाहायला मिळत आहे.
भाववाढीची ५ प्रमुख कारणे
- औद्योगिक मागणीत मोठी वाढ : हाय-टेक आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये चांदीचा वापर वाढला आहे. विशेषतः सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांदीची मागणी प्रचंड आहे.
- पुरवठ्याचा तुटवडा : सलग पाचव्या वर्षी जागतिक बाजारात चांदीच्या पुरवठ्यात तूट निर्माण झाली आहे. उत्पादनापेक्षा मागणी अधिक असल्याने किमती वाढत आहेत.
- यूएस फेडकडून दर कपातीची शक्यता : अमेरिकेतील बेरोजगारीचा दर ४.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे 'फेडरल रिझर्व्ह' आगामी काळात व्याजदरात कपात करू शकते, ज्यामुळे चांदीची गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल.
- सुरक्षित गुंतवणूक : जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार 'सिल्व्हर ईटीएफ'मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत.
वाचा - तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
- रुपयाची घसरण : डॉलरच्या तुलनेत रुपया यंदा ६ टक्क्यांनी घसरला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणारी चांदी अधिक महाग पडत आहे.
