मुंबई बेस्ड लॉजिस्टिक्स कंपनी ओम फ्रेट फॉरवर्डर्सचा (Om Freight Forwarders) शेअर पहिल्याच दिवशी धडाम झाला आहे. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात ४० टक्क्यांच्या डिस्काउंटसह झाली, यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्यावर अक्षरशः डोके झोडून घेण्याची वेळ आली आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत १३५ रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, बुधवारी (८ ऑक्टोबर) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर हा शर ४० टक्क्यांच्या डिस्काउंटसह, म्हणजेच ८१.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला.
हा शेअर इश्यू प्राइसपेक्षा ५३.५० रुपयांनी खाली सूचीबद्ध झाल्याने बाजारात निराशेचे वातावरण होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वरही कंपनीचे शेअर्स ८२.५० रुपयांवर सूचीबद्ध झाले. कंपनीचा एकूण आयपीओ कोटा १२२.३१ कोटी रुपये एवढा होता, जो २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खुला होता.
लिस्टिंगनंतर अशी होती स्थिती -
कमकुवत सुरुवातीनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये काहीशी वाढ दिसून आली. NSE वर हा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह ८५.५७ रुपयांवर पोहोचला. तर BSE वर ५ टक्क्यांच्या वाढीसह ८६.६० रुपयांवर पोहोचला. आयपीओनंतर प्रवर्तकांची (Promoters) भागीदारी ९९.०४ टक्क्यांवरून ७२.०९ टक्क्यांवर आली आहे. राहुल जगन्नाथ जोशी, जितेंद्र मगनलाल जोशी, हर्मेश राहुल जोशी आणि कामेश राहुल जोशी हे या कंपनीचे प्रवर्तक अथवा प्रमोटर्स आहेत.
सामान्य प्रतिसाद
ओम फ्रेट फॉरवर्डर्सचा आयपीओ एकूण ३.८८ पट सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदार विभागात २.७७ पट, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) विभागात ७.३९ पट आणि संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) विभागात ३.९७ पट सबस्क्रिप्शन मिळाले. तर कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत केवळ ०.५७ पट एवढेच सबस्क्रिप्शन मिळाले होते. जून १९९५ मध्ये स्थापन झालेली ओम फ्रेट फॉरवर्डर्स ही थर्ड जनरेशन लॉजिस्टिक्स कंपनी असून, ती ५ खंडांमध्ये आणि ७०० हून अधिक ठिकाणी सेवा पुरवते.