Share Market Opening: शेअर बाजारासाठी २५ मार्चची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली. जागतिक बाजारपेठेतून मिळणारे सकारात्मक संकेत आणि मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग विरण्याची शक्यता निर्माण झाल्यानं भारतीय गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू उमललं आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी बाजाराची सुरुवात जबरदस्त झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही विक्रमी मजबुतीसह ग्रीन झोनमध्ये उघडले. सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्सनं सुमारे ९०० अंकांची झेप घेऊन ७५,००० ची पातळी पार केली, तर निफ्टी ३०० अंकांनी वधारून २३,३०० च्या पातळीच्या वर व्यापार करत आहे.
या शेअर्समध्ये दिसली सर्वाधिक हालचाल
बाजार उघडताच श्रीराम फायनान्स, एम अँड एम (M&M), एसबीआय (SBI), टायटन कंपनी आणि टीएमपीव्ही (TMPV) यांसारख्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली आणि हे निफ्टीच्या 'टॉप गेनर्स'मध्ये सामील झाले. दुसरीकडे, आयटी (IT) क्षेत्रातील काही शेअर्स जसं की टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांच्यावर किंचित दबाव पाहायला मिळाला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, बाजारपेठेत सुमारे १७९५ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर केवळ ४६७ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
₹५५०० पेक्षा अधिकनं महागलं सोनं, चांदीच्या किंमतीतही ₹१२००० पेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
बाजारपेठेतील तेजीची प्रमुख कारणे
१. इराण-अमेरिका दरम्यान शांततेची आशा:
मध्य-पूर्वेतील तणाव आता कमी होताना दिसत आहे. अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं बाजारात चैतन्य निर्माण केलंय, ज्यात त्यांनी म्हटलंय की अमेरिका आणि इराण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमत आहेत. तसंच, इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील अमेरिकन हल्ले पाच दिवसांसाठी थांबवण्याच्या आदेशानं राजनैतिक विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.
२. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण:
भारतासारख्या तेल आयातदार देशासाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी कच्च्या तेलाच्या किमतीतून आली आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती ५% पेक्षा जास्त घसरून १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. जूनसाठी ब्रेंट ऑइल फ्युचर्स ९३.४५ डॉलरपर्यंत खाली घसरलेत. तेल स्वस्त झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि कंपन्यांचा खर्च कमी होईल, ज्याचा थेट फायदा शेअर बाजाराला मिळत आहे.
