Shakti Pumps Multibagger Shares: शक्ती पंप्सचा शेअर गेल्या काही दिवसांपासून फोकसमध्ये आहे. गेल्या ३ दिवसांपासून शेअरला अपर सर्किट लागतंय. यानंतर या मल्टीबॅगर शेअरची किंमत ८८६.७० रुपयांच्या लेव्हलवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्समधील तेजीच्या मागे एक नवी माहिती असल्याचं म्हटलं जातंय. येत्या वर्षभरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (MSEDCL) २५ हजार पंपांची ऑर्डर मिळणार आहे. जीएसटीसह या ऑर्डरची किंमत ७५४.३० कोटी रुपये आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आदेश जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत हे काम करावं लागणार असल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली.
कंपनीला महाराष्ट्रातून मिळालेलं हे दुसरं पत्र आहे. यापूर्वी कंपनीला ५० हजार पंप्सचं काम मिळालं होतं. या नव्या ऑर्डरनंतर कंपनीने आनंद व्यक्त केलाय. तसंच या ऑर्डरमुळे महाराष्ट्रात आमचं स्थान मजबूत होईल, असंही कंपनीनं म्हटलंय.
सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट
बीएसईवर सलग तीन दिवस कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं. यापूर्वी ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सनी अपर सर्किटला धडक दिली होती. गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअरची किंमत १६ टक्क्यांनी वाढली आहे. तर, या मल्टीबॅगर शेअरनं गेल्या महिन्याभरात जवळपास २१ टक्के परतावा दिला आहे. २ वर्षांत या शेअरनं तब्बल ११६० टक्क्यांचा रिटर्न दिलाय. कंपनीचा ५२ आठवड्यांचं उच्चांकी स्तर ९०१ रुपये आणि नीचांकी स्तर १५५.१७ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १०,६५९.०७ कोटी रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)