SEBI New Rule: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) उद्या १ ऑक्टोबरपासून डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी नवीन नियम लागू करत आहे. इंट्राडे ट्रेडिंगमधील अनावश्यक जोखीम आणि मोठ्या चढ-उतारांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशान हे नियम आणले गेले आहेत. SEBI नं आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय की, बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी इक्विटी इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जमध्ये प्रत्येक ट्रेडिंग संस्थेसाठी इंट्राडे पोझिशनची मर्यादा निश्चित केली गेली आहे. ही मर्यादा उद्या १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.
नवीन नियमांमुळे काय बदलणार?
नवीन नियमानुसार, आता कोणत्याही संस्थेची नेट इंट्राडे पोझिशन (फ्युचर्स-इक्विव्हॅलेंट बेसिसवर) ₹५,००० कोटींपेक्षा जास्त असू शकणार नाही. तसंच, ग्रॉस पोझिशनची मर्यादा ₹१०,००० कोटी निश्चित करण्यात आली आहे, जी सध्या एंड-ऑफ-डे मर्यादेएवढी आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा ट्रेडर मोठे व्यवहार करून बाजाराची स्थिरता बिघडवू नये, विशेषतः ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
देखरेख आणि नियमांचे उल्लंघन
स्टॉक एक्सचेंजला आता ट्रेडिंग दरम्यान किमान ४ वेळा रँडम स्नॅपशॉट घेऊन देखरेख करणं अनिवार्य आहे; यापैकी एक स्नॅपशॉट दुपारी २:४५ ते ३:३० वाजेदरम्यान घेणं बंधनकारक असेल. कारण ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या तासात अनेकदा मोठी हालचाल दिसून येते. तसेच, एक्सचेंजला पोझिशनची देखरेख करताना इंडेक्सच्या सध्याच्या किमतीचा देखील विचार करावा लागणार आहे, जेणेकरून रियल-टाइम जोखीमचं योग्य मूल्यांकन होईल.
जर एखाद्या संस्थेनं ठरवून दिलेली मर्यादा मोडल्यास, स्टॉक एक्सचेंज त्या संस्थेच्या ट्रेडिंग पॅटर्नची तपासणी करेल, क्लायंटकडून स्पष्टीकरण मागितलं जाईल आणि इंडेक्सशी संबंधित स्टॉक्समध्ये केलेल्या ट्रेडिंगची तपासणी केली जाईल. गरज वाटल्यास, SEBI च्या सर्व्हिलन्स मीटिंगमध्ये तो केस रिपोर्ट केला जाईल. विशेषत: एक्सपायरीच्या दिवशी उल्लंघन करणाऱ्या ट्रेडिंग संस्थांवर दंड किंवा अतिरिक्त सर्व्हिलन्स डिपॉझिट लावला जाऊ शकतो.
कारवाईमागचे कारण
काही ट्रेडिंग संस्था बाजारात असामान्यपणे मोठे व्यवहार करत आहेत, विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी मोठ्या पोझिशन घेऊन अस्थिरता निर्माण करतात, अशी चिंता अलीकडच्या महिन्यात वाढली होती. यामुळे बाजारात अव्यवस्था निर्माण होऊन गैरफायदा घेतला जात होता. Jane Street Group शी संबंधित कथित हेराफेरीच्या घटनेनंतर नियामक अधिक सतर्क झाला आहे. इंट्राडे देखरेखीचे हे नवीन नियम १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होतील, तर एक्सपायरीच्या दिवशीच्या नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित दंडाची तरतूद ६ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल.