SEBI website and sarathi app : 'रिस्क है तो इश्क है' हा शेअर बाजारातील घोटळ्यावर आधारीत वेब सीरिज स्कॅम १९९२ मधील संवाद तुम्हीही अनेकदा ऐकला असेल. मात्र, असे संवाद ऐकून किंवा शेअर बाजारातून रात्रीत श्रीमंत झाल्याच्या स्टोरी पाहून चुकूनही बाजारात गुंतवणूक करू नका. कारण, शेअर बाजार हा कुठल्याही प्रकारचा जुगार नाही. इथं अभ्यास केल्याशिवाय एक रुपयाही गुंतवणे चुक ठरू शकते. तुम्हाला शेअर बाजाराविषयी जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर रील्स किंवा व्हिडिओ पाहण्याऐवजी तुम्ही सेबीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. वास्तविक, सेबीनेगुंतवणूकदारांना जागरूक आणि शिक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
या अंतर्गत SEBI ने आपल्या गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांची वेबसाइट आणि 'सारथी' ॲपवर मोफत सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि इतर साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. "सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून सेबीने गुंतवणूकदारांची जागरूकता आणि शिक्षण वाढविण्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर टूल्स (सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स) लाँच केले आहेत," अशी माहिती सेबीने दिली आहे.
नवीन आणि जुन्या गुंतवणूकदारांना हे टूल्स आणि साहित्य बाजारात गुंतवणूक करण्यास मदत करेल. या वेबसाइटवर स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) आणि नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन (NCFE) सारख्या संस्थांचे व्हिडिओंचे भांडार आहे.
‘स्पॉट अ स्कॅम’ सारखे पर्याय वापरकर्त्यांना गुंतवणूक ऑफरच्या वैधतेचे मूल्यांकन करण्यास मदत करतात. तर तुमची आर्थिक हेल्थ तपासणी टूल वैयक्तिक आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यात मदत करते. त्यात सुधारणा कशी करावी याबद्दल सूचना देखील देते.
गुंतवणूकदारांना कशी होणार मदत?
याव्यतिरिक्त, गुंतवणुकीचे नियोजन आणि निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले २४ आर्थिक ‘कॅल्क्युलेटर’ देखील सेबीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. सारथी अॅपवर, गुंतवणूक विषय, तक्रार निवारण यंत्रणा आणि ऑनलाइन विवाद निराकरणासाठी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ही भांडवली बाजारावर देखरेख ठेवणारी संस्था आहे. सेबी केवळ गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करत नाही तर बाजारात चुकीची कामे करणाऱ्यांना शिक्षाही करते.