शेअर बाजारातील फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग (F&O Trading) हा अत्यंत जोखमीचा व्यवहार आहे. याबाबत मार्केट रेग्युलेटर SEBI नेहमीच इशारा देत असते, तरीही लाखो गुंतवणूकदार कोणत्याही अनुभवाशिवाय F&O ट्रेडिंग करत आहेत आणि मोठे नुकसान सोसत आहेत. याच संदर्भात एका गुंतवणूकदाराच्या नुकसानीची धक्कादायक कथा समोर आली आहे, जिथे एका ३० वर्षीय व्यक्तीनं सांगितलं की त्याला ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये २ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला त्या व्यक्तीनं Reddit वर सांगितलं की, तो दरमहा २.८५ लाख रुपये कमावतो, परंतु ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये २ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो सतत कर्ज घेत राहिला. या व्यक्तीनं आता नेटिझन्सकडे आपलं कर्ज कमी करण्याचे मार्ग सुचवण्यासाठी मदत मागितली आहे.
भारत, चीन, ब्राझील आणि सौदी अरेबिया अमेरिकेतून काढताहेत पैसे, जाणून घ्या कारण
F&O ट्रेडिंगमध्ये २ कोटी रुपये कसे बुडाले?
या व्यक्तीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे की, तो एका नामांकित कंपनीत नोकरी करतो आणि त्याचा मासिक हातात येणारा पगार (Take-home salary) सुमारे २.८५ लाख रुपये आहे. या व्यक्तीनं म्हटलं, "गेल्या काही वर्षांत मी ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये खूप जास्त गुंतलो गेलो. याची सुरुवात 'साइड इन्वेस्टिंग' म्हणून झाली होती, पण हळूहळू ते घातक ठरलं."
"या काळात मी खूप मोठी रक्कम (२ कोटींहून अधिक) गमावली आहे आणि नुकसान भरून काढण्यासाठी तसंच खर्च भागवण्यासाठी मी कर्ज घेत राहिलो. आज माझ्यावर असलेले अनसिक्योर्ड कर्ज काही असं आहे..."
२७ लाख रुपयांचं पर्सनल लोन
२८ लाख रुपयांचं OD (ओव्हरड्राफ्ट) लोन
NBFC कडून ८-९ लाख रुपयांचे कर्ज
१२ लाख रुपये क्रेडिट कार्डची थकबाकी
काय आहे F&O ट्रेडिंग?
शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन हे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगच्या अंतर्गत येतात, ज्याला सामान्य भाषेत 'वायदा बाजार' म्हटलं जातं. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये प्रत्यक्ष शेअर्स खरेदी करण्याची गरज नसते, कारण यामध्ये व्यापारी शेअर्सच्या फ्युचर आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवहार करतात. म्हणजेच स्टॉक खरेदी करण्याऐवजी वेगवेगळ्या महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट खरेदी-विक्री केले जातात. ही ट्रेडिंग अत्यंत उच्च जोखीम आणि उच्च परतावा असलेली असते. यामध्ये पैसा जेवढ्या वेगाने तयार होतो, तेवढ्याच वेगाने तो बुडूही शकतो.
(टीप : फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग हे धोकादायक आहे. बाजार नियामक सेबीच्या अभ्यासानुसार, दर १० पैकी ९ गुंतवणूकदार दरवर्षी त्यात पैसे गमावतात. म्हणून, प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करा.)
