Stock Alert BSE: आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. कंपनीचे शेअर्स मंगळवारी २% च्या उसळीसह ९४७८ रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या १८ महिन्यांहून अधिक काळात आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स ६३००० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कंपनीचे शेअर्स या कालावधीत १५ रुपयांवरून ९४०० रुपयांच्या पुढे गेलेत. गेल्या काही दिवसांत अशीही अफवा पसरली होती की, माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स खरेदी केले आहेत. कंपनीने यावर स्पष्टीकरणही दिलंय. कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या या जोरदार तेजीनंतर मुंबई शेअर बाजारानंगुंतवणूकदारांना सतर्क केलंय.
BSE नं गुंतवणूकदारांना केलं अलर्ट
बीएसईनं मंगळवारी एक 'इन्व्हेस्टर अलर्ट' जारी केला आहे. बीएसईनं इशारा दिलाय की, आरआरपी सेमीकंडक्टरच्या स्टॉक प्राईसमध्ये आलेली मोठी वाढ कंपनीच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांशी जुळत नाही. बीएसईनं एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलंय की, 'या स्टॉकवर पैसे लावण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.' 'स्पेक्युलेटिव्ह' हालचाली थांबवण्यासाठी एक्सचेंजने आरआरपी सेमीकंडक्टरला 'इनहैंस्ड सर्व्हेलन्स मेजर फ्रेमवर्क' अंतर्गत ठेवलं आहे.
सचिन तेंडुलकरने पैसे गुंतवल्याची अफवा
गेल्या काही दिवसांत मार्केटमध्ये अशी अफवा पसरली होती की, सचिन तेंडुलकरनं आरआरपी सेमीकंडक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीने या अफवेवर स्पष्टीकरणही दिलं. आरआरपी सेमीकंडक्टरनं एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितलं की, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं कधीही कंपनीचे कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नाहीत. आरआरपी सेमीकंडक्टरने म्हटलंय, तेंडुलकर हे कंपनीचे भागधारक नाहीत. आरआरपी सेमीकंडक्टरने आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं की, तेंडुलकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोर्डाच्या सदस्यांशी जोडलेले नाहीत. तसेच, ते कंपनीचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' देखील नाहीत.
वर्षभरात १२०००% हून अधिक वाढ
आरआरपी सेमीकंडक्टरचे शेअर्स गेल्या एक वर्षात १२,७९७ टक्के वाढले आहेत. स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ७३.४९ रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स २१ ऑक्टोबर २०२५ रोजी ९४७८ रुपयांवर बंद झाले आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ५००९ टक्क्यांची जबरदस्त तेजी दिसून आली आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स १११० टक्के नी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ९४७८ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७२.०५ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)