Gold Vs Stock Market : गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. मात्र, ही वाढ शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळेच शेअर बाजारात मंदी येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सोन्याची किंमत वाढल्यास शेअर बाजारात घसरण होते, असे मानले जाते. या परिस्थितीत १९७१ च्या 'निक्सन शॉक' सारखी आर्थिक मंदी येऊ शकते अशी भीतीही काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
मात्र, भारतातील आघाडीची ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते, सोने आणि शेअर बाजाराचा संबंध आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. सोन्याच्या दरात झालेली वाढ ही केवळ एक योगायोग आहे, ती शेअर बाजारातील घसरणीचे संकेत नाही.
सोने-शेअर बाजार संबंध कसा असतो?
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, पूर्वी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे बाजारात जोखीम वाढायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. आजकाल सोन्याचे भाव वाढले म्हणजे शेअर बाजार कोसळेल असे नाही, आणि शेअर बाजारात तेजी आली म्हणजे सोने स्वस्त होईल असेही नाही. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, सोन्याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे काही देशांमधील व्यापार शुल्क वाढीचे प्रश्न आणि जागतिक मध्यवर्ती बँकांची सोन्याची वाढलेली मागणी. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत सोन्याचे भाव वाढू शकतात.
पूर्वीही असे घडले आहे
- सोने आणि शेअर बाजारातील संबंध नेहमीच नकारात्मक असतो, असे नाही. यापूर्वीही अनेकवेळा दोन्हीमध्ये सकारात्मक संबंध दिसून आला आहे.
- २००८-०९ चा जागतिक आर्थिक संकट: या संकटानंतर, २०१० मध्ये सोन्याचे भाव वाढत असताना शेअर बाजारातही मोठी उसळी आली होती.
- १९८० चे दशक: या काळातही सोने आणि शेअर्स या दोन्हीमध्ये एकाच वेळी विक्रमी वाढ झाली होती.
वाचा - सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
यामुळे, सोन्याच्या दरातील बदलांचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी संकेत म्हणून करणे चुकीचे ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गुंतवणूकदारांनी प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय घेताना वेगवेगळ्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.