Reliance Shares rocket : जागतिक राजकारणातील 'व्हेनेझुएला' संकटामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली असताना, रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मात्र ही घटना फायदेशीर ठरताना दिसत आहे. सोमवारी (५ जानेवारी) बाजार उघडताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने १ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत १,६११.८ रुपयांचा नवीन ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला. व्हेनेझुएलावरील अमेरिकन हल्ल्यानंतर जागतिक तेल बाजारात निर्माण झालेल्या स्थितीचा रिलायन्सला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिलायन्सला नेमका काय फायदा?
अमेरिकेने व्हेनेझुएलावर नियंत्रण मिळवल्यास त्या देशावर असलेले तेल निर्यातीचे निर्बंध शिथिल होऊ शकतात. जेफरीज या ब्रोकरेज फर्मच्या मते, निर्बंध उठल्यास रिलायन्सला व्हेनेझुएलाकडून ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रति बॅरल ५ ते ८ डॉलर्स स्वस्त दरात कच्चे तेल मिळू शकते. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे रिलायन्सच्या रिफायनिंग व्यवसायातील 'ग्रॉस रिफायनिंग मार्जिन' वाढणार असून, कंपनीच्या महसुलात मोठी भर पडणार आहे.
रिलायन्सची बाजारातील कामगिरी
रिलायन्सच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून सातत्यपूर्ण तेजी पाहायला मिळत आहे.
१ वर्षाचा परतावा : ३० टक्क्यांहून अधिक.
५ वर्षांचा परतावा : ६५ टक्क्यांहून अधिक.
मॉर्गन स्टेनली या जागतिक ब्रोकरेज फर्मने रिलायन्सला 'ओव्हरवेट' रेटिंग दिले असून, प्रति शेअर १,८४७ रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.
इतर तेल कंपन्यांची स्थिती
रिलायन्स व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र अस्थिरता दिसून आली. ओएनजीसी सुरुवातीला २ टक्क्यांनी वधारला, पण नंतर नफेखोरीमुळे घसरला. आयओसी, बीपीएसएल, एचपीसीएल या ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सुरुवातीला तेजी दाखवली, पण दुपारपर्यंत हे शेअर्स लाल निशाणीत व्यवहार करत होते.
वाचा - गुंतवणूक आणि बँकिंग व्यवहार ठप्प होण्याची भीती; निष्क्रिय पॅन कार्ड ऑनलाइन कसे तपासावे? सोपी पद्धत
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
