Reliance Power Share Price : २०२४ वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाचं हे वर्ष उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी खूप खास राहिलं आहे. दिवाळखोरीच्या वाटेवर असलेले अनिल अंबानी पुन्हा एकदा जोमाने उभे राहिले आहेत. आता वर्षाच्या अखेरीस असतानाही त्यांच्या रिलायन्स पॉवरने कमाल केली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांच्या उसळीसह ४६.२४ वर उघडला. स्टॉक उघडताच त्याला अप्पर सर्किट लागले. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रिलायन्स एनयू सनटेकला बॅटरी एनर्जी स्टोरेजचा ९३० मेगावॅट सौरऊर्जेचा प्रकल्प मिळाला आहे, ज्यामुळे स्टॉकमध्ये जोरदार वाढ झाली आहे.
रिलायन्स पॉवरच्या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट
१२ डिसेंबर २०२४ रोजी ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार उघडला तेव्हा रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांच्या वाढीसह ट्रेडिंग सुरू झाले. आरपॉवरचे शेअर्स ४६.२४ रुपयांवर उघडले. गेल्या सत्रात शेअर ४४.०२ रुपयांवर बंद झाला होता. मल्टीबॅगर स्टॉक रिलायन्स पॉवरसाठी २०२४ हे वर्ष उत्तम आहे. चालू वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास १०० टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात स्टॉक २० टक्क्यांनी वाढला आहे.
९३० मेगावॅटचा सौर प्रकल्प मिळाला
सोलर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ई-रिव्हर्स लिलावात, ९ डिसेंबर२०२४ रोजी रिलायन्स पॉवरची उपकंपनी रिलायन्स NU सनटेकने ९३० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पासोबत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम प्रकल्पा मिळवला आहे. निविदेच्या अटींनुसार, रिलायन्स एनयू सनटेक (Reliance NU Suntech) ला सौर उर्जेद्वारे चार्ज होणारे ४६५ MW/१८६० MWh किमान स्टोरेज क्षमता उभी करावी लागेल. रिलायन्स एनयू सनटेकने ३.५३ रुपये प्रति किलोवॅट दराने बोली लावली होती. सोलर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिलायन्ससोबत २५ वर्षांसाठी वीज खरेदी करार करणार आहे. रिलायन्स एनयू सनटेककडून खरेदी केलेली वीज वेगवेगळ्या डिस्कॉम्सना विकली जाईल. रिलायन्स NU सनटेक हा प्रकल्प 'बिल्ड-ओन-ऑपरेट' (BOO) तत्त्वावर विकसित करणार आहे.
SECI ने घेतली बंदी मागे
रिलायन्स पॉवरसाठी ही दिलासादायक बाब आहे. कारण, भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने, रिलायन्स पॉवरला सौर प्रकल्पांसाठी बोली लावण्यास बंदी घातली होती. ही बंदी उठवल्याने रिलायन्सच्या उपकंपनीला ९३० मेगावॅटचा सौर प्रकल्प दिला आहे. ३ डिसेंबर २०२४ रोजी नियामक फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले होते की रिलायन्स पॉवर लिमिटेडवर लादलेली बंदी नोटीस सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने मागे घेतली आहे.
भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने बनावट बँक हमी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी रिलायन्स पॉवरला पुढील ३ वर्षांसाठी भविष्यातील निविदांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली होती. पण दिल्ली उच्च न्यायालयाने रिलायन्स पॉवरवर बंदी घालण्याच्या एसईसीआयच्या नोटीसला स्थगिती दिली.