Quadrant Future Tek IPO: शेअर बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या क्वाड्रंट फ्युचर टेक या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून येत आहे. बुधवारी बीएसईवर क्वाड्रंट फ्युचर टेकचा शेअर १९ टक्क्यांनी वधारून ५३७.८० रुपयांवर पोहोचला. क्वाड्रंट फ्युचर टेकचे शेअर्स १४ जानेवारी रोजी बाजारात लिस्ट झाले होते.
आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत २९० रुपये होती. दोन दिवसांत कंपनीचा शेअर २९० रुपयांवरून ५३० रुपयांवर पोहोचला . क्वाड्रंट फ्यूचर टेकनं (Quadrant Future Tek IPO) भारतीय रेल्वेच्या कवच (KAVACH)प्रकल्पासाठी नेक्स्ट जनरेशन ट्रेन कंट्रोल आणि सिग्नलिंग सिस्टीम विकसित केली आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच दिवशी जोरदार तेजी
क्वाड्रंट फ्युचर टेकच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत २९० रुपये होती. क्वाड्रंट फ्यूचर टेकचा शेअर १४ जानेवारी २०२५ रोजी बीएसईवर ३७४ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आणि तो ४४८.७५ रुपयांवर पोहोचला. क्वाड्रंट फ्युचर टेकच्या शेअरनं बुधवारी, १५ जानेवारी रोजी ५३७.८० रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनीचा आयपीओ ७ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि ९ जानेवारीपर्यंत खुला राहिला. क्वाड्रंट फ्युचर टेकच्या पब्लिक इश्यूची एकूण इश्यू साइज २९० कोटी रुपयांपर्यंत होती.
किती सब्सक्रिप्शन?
शेअर विक्रीच्या शेवटच्या दिवशी क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा आयपीओ १८५.८२ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत ५७,९९,९९९ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत १,०७,७७,२९,३०० शेअर्ससाठी बोली लागली होती. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा २५४.१६ पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २४३.१२ पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) हिस्सा १३२.५४ पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा आयपीओ पहिल्याच दिवशी काही मिनिटांत भरला.
अँकर गुंतवणूकदारांकडून १३० कोटी जमा
कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती. आयपीओसाठी २७५ ते २९० रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. हा आयपीओ पूर्णपणे २९० कोटी रुपयांच्या नवीन शेअर्सवर आधारित आहे आणि त्यात कोणत्याही ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश नाही. आयपीओतून मिळणारी रक्कम दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी वापरली जाणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)