शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक लागला. कामकाजाच्या सुरुवातीला बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स १४० अंकांनी घसरून उघडला. तर, निफ्टीही ५० अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. आयटी स्टॉक्समधील विक्रीमुळे बाजारावर दबाव येत होता.
सकाळी ९:३० वाजेपर्यंत बाजार हळूहळू ग्रीन झोनकडे सरकताना दिसला. निफ्टी २५,५९० च्या आसपास फ्लॅट ट्रेड करत होता. सेन्सेक्स ११ अंकांच्या घसरणीसह ८३,४५५ वर चालत होता. बँक निफ्टी १३ अंकांच्या किरकोळ वाढीसह ५७,४३१ वर ट्रेड करत होता. निफ्टी ५० वर एशियन पेंट्स, महिंद्रा, नेस्ले इंडिया, श्रीराम फायनान्स, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, मॅक्स हेल्थ हे टॉप गेनर्स होते. तर, विप्रो, इटर्नल, इन्फोसिस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रामध्ये घसरण होती. विप्रोच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
काल गुरुवारी ब्रेकआउट सत्रात परदेशी आणि देशांतर्गत दोन्ही संस्थागत गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. तसंच, सोने-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा इतिहास रचला, तर कच्चा तेल पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली आहे, पण आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारासाठी थोडे संमिश्र संकेत आहेत. अमेरिकन फ्युचर्स आणि गिफ्ट निफ्टीमध्ये घसरण दिसून आली.
FII-DII च्या खरेदीमुळे विश्वास वाढला
कालच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी FIIs कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्समध्ये मिळून सुमारे ₹६,५०० कोटींची तगडी खरेदी केली. देशांतर्गत फंड्सनी DIIs देखील सलग ३७ व्या दिवशी बाजारात पैसा ओतला आणि सुमारे ₹४,१०० कोटींची खरेदी केली. सातत्यानं FII-DII चा पाठिंबा मिळत असल्यानं बाजाराचे सेंटिमेंट आणखी मजबूत झाले.