Ola Electric Share :ओला इलेक्ट्रिक कंपनीची स्कूटर जेव्हापासून बाजारात आली आहे. तेव्हापासून कुठल्या ना कुठल्या कारणातून सतत चर्चेत असते. सर्व्हिससाठी तर थेट केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करावा लागला होता. अशा सर्व वादविवादातून कंपनी वाट काढत असतानाच आज मोठा धक्का बसला. सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओला इलेक्ट्रिकचे समभाग ३ टक्क्यांनी घसरले. ओला या महिन्यात त्यांची बहुप्रतिक्षीत बाईक सादर करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थिती कंपनीचे शेअर्स घसरल्याने वाहनांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. यामध्ये ८७ लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली आहे. शेअर बाजाराशिवाय ओला इलेक्ट्रिकलाही अनेक प्रकारचे धक्के बसत आहेत. ओला इलेक्ट्रिकला CCPA म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अनेक नोटिसा दिल्या आहेत. सीसीपीए अहवालाच्या आधारे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटकातील उच्च न्यायालय देखील ओला इलेक्ट्रिकच्या विरोधात सुनावणी करत आहे.
ओलाच्या शेअर्स घसरण्यामागे कोणाचा हात?
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकला तिसऱ्या तिमाहीत ५६४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ओला इलेक्ट्रिकला तिसऱ्या तिमाहीत तीव्र स्पर्धा आणि ग्राहक सेवेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे हा तोटा सहन करावा लागला आहे. मागील तिमाहीत म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत देखील ओला इलेक्ट्रिकला ३७६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ओला इलेक्ट्रिकने तिसऱ्या तिमाहीत १०४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत १२९६ कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे, तिसऱ्या तिमाहीत १५०५ कोटी रुपये खर्च करण्यात आले, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत १५९७ कोटी रुपये होते.
सणासुदीच्या काळातही वाढ नाही
साधारणपणे सणासुदीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी करतात. कंपनीचे म्हणणे आहे, की ऑक्टोबर २०२४ मध्ये फेस्टीव हंगामात चांगली विक्री झाली. मात्र, एकत्रित कामगिरी घसरली. सेवेशी संबंधित अडथळे दूर करण्यात आले आहेत. शिवाय आता नेटवर्क विस्ताराद्वारे मार्केट शेअर आणि मार्जिन सुधारणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.