Ola Electric Mobility : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चौफेर तेजी असताना ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने मार्च महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध केल्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला, ज्यामुळे कंपनीचा शेअर १२ टक्क्यांहून अधिक वधारला. सेवा केंद्रांमधील सुधारणा आणि वाढत्या विक्रीमुळे ओला इलेक्ट्रिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शेअर बाजारातील 'करंट'
दुपारी १:२२ वाजेच्या सुमारास बीएसईवर ओला इलेक्ट्रिकचा शेअर २५.६९ रुपयांवर व्यवहार करत होता, जी १२.६८% ची मोठी वाढ आहे. शेअरने दिवसभरात २६.०४ रुपयाची पातळी ओलांडली. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे १०.७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, सेन्सेक्समध्ये २.०८% वाढ असताना ओलाने बाजार निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे.
विक्रीत १५० टक्क्यांची भरघोस वाढ
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यामागे कंपनीने जाहीर केलेली मार्चची आकडेवारी महत्त्वाची ठरली. मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात दररोजचे बुकिंग १,००० युनिट्सच्या पार गेले. मार्चमध्ये १०,११७ वाहनांची नोंदणी झाली, जी फेब्रुवारीच्या (३,९७३ युनिट्स) तुलनेत १५० टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. एकूण १० लाख (१ मिलियन) नोंदणीचा टप्पा पार करणारी ओला ही भारतातील पहिली ईव्ही कंपनी ठरली आहे.
'सर्व्हिस' सुधारली, मागणी वाढली!
ओलाने आपल्या सर्व्हिस नेटवर्कमध्ये केलेल्या मोठ्या बदलांचा सकारात्मक परिणाम विक्रीवर झाला आहे. आता ८०% हून अधिक वाहनांची सर्व्हिस त्याच दिवशी पूर्ण होत आहे. सुट्या भागांची सुलभ उपलब्धता आणि जलद तपासणी यामुळे ग्राहकांचा अनुभव सुधारला आहे.
वाचा - गॅस संपलाय? टेन्शन सोडा, आता ५ मिनिटांत मिळणार 'छोटू' सिलेंडर! इंडियन ऑईलची खास सुविधा
भविष्यातील 'ईव्ही हब'
तामिळनाडूतील 'फ्युचर फॅक्टरी' हे देशातील मोठे ईव्ही केंद्र बनत आहे, तर बेंगळुरू येथील 'बॅटरी इनोव्हेशन सेंटर' नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बॅटरी सेलपासून ते ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत कंपनीने स्वतःचे जाळे विस्तारले आहे.
