एसएमई कंपनी निर्माण अॅग्री जेनेटिक्सचे (Nirman Agri Genetics) शेअर्स बुधवारी जोरदार आपटले. कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं असून ते घसरून १६६.८५ रुपयांवर पोहोचलेत.
आयपीओ फंड्सच्या कथित गैरवापरामुळे बाजार नियामक संस्था 'सेबी'नं (SEBI) कंपनीला स्टॉक मार्केटमधून बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त, सेबीनं पुढील आदेशापर्यंत कंपनीला सर्व प्रस्तावित कॉर्पोरेट अॅक्शन थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये बोनस शेअरजारी करणं, शेअर्सचे विभाजन आणि आपले नाव बदलून 'ॲग्रीकेअर लाइफ कॉर्प लिमिटेड' ठेवणं यांचा समावेश आहे.
आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
प्रमोटरला शेअर्स खरेदी-विक्रीवर बंदी
मंगळवारी जारी केलेल्या अंतरिम आदेशात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी पुढील आदेशापर्यंत कंपनीचे प्रमोटर प्रणव कैलाश बागल यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेडचे (NAGL) शेअर्स खरेदी, विक्री किंवा डीलिंग करण्यावर बंदी घातली आहे.
बाजार नियामक संस्था सेबीच्या तपासात असं आढळून आलंय कंपनीनं आयपीओमधून जमा केलेल्या २०.३० कोटी रुपयांच्या एकूण निधीपैकी सुमारे १८.८९ कोटी रुपये म्हणजे ९३ टक्के निधीचा गैरवापर केला आहे. हा निधी एकतर बनावट, संशयास्पद किंवा बागल आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नियंत्रणाखालील संस्थांमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. फंड युटिलायझेशनबाबत निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेडनं परस्परविरोधी माहिती उपलब्ध करून दिल्याचं नियामक संस्थेला आढळलंय.
आयपीओमध्ये ९९ रुपये होती शेअरची किंमत
आयपीओमध्ये निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेडच्या शेअरचा दर ९९ रुपये होता. कंपनीचा आयपीओ १५ मार्च २०२३ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि तो २० मार्च २०२३ पर्यंत ओपन होता. कंपनीचे शेअर्स २८ मार्च २०२३ रोजी १०२ रुपयांवर लिस्ट झाले होते.
कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५६ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक १३०.१० रुपये आहे. निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेडचा आयपीओ एकूण १.७१ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा २.२ पट, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १.२२ (१.२२) पट सबस्क्राइब झाला होता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)