रब्बी हंगामात खताच्या उपलब्धतेबद्दल शेतकरी व्यक्त करत असलेल्या चिंतेवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवार लोकसभेत मोठं विधान केलं. अनुदानासाठीच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना त्यांनी स्पष्ट केलं की, देशात रब्बी पिकांसाठी खत, विशेषतः युरियाची कोणतीही कमतरता नाही. त्यांच्या या विधानानंतर शेअर बाजारात खत उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.
अर्थमंत्री काय म्हणाल्या?
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सरकारनं योग्य वेळी पाऊल उचलून युरियाचा साठा लक्षणीयरीत्या वाढवला आहे. त्या म्हणाल्या की, १ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात युरियाचा साठा ४८.६४ लाख मेट्रिक टन होता, जो केवळ एका महिन्यात वाढवून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ६८.८५ लाख मेट्रिक टन करण्यात आला. म्हणजेच, सुमारे २०.२१ लाख मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा विचारपूर्वक आयातीद्वारे जोडला गेला, जेणेकरून खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात कमतरता भासू नये.
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
निर्मला सीतारमण यांनी हेदेखील स्पष्ट केलं की, यावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढली आहे, जे अगदी स्वाभाविक आहे. "चांगला पाऊस झाल्यास पिकांसाठी खताची गरजही जास्त असते. शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे," असं त्या म्हणाल्या. राज्यांशी सातत्यानं ठेवलेले समन्वय आणि उत्तम पुरवठा व्यवस्थापनामुळे हे शक्य झाल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
शेअर्समध्ये जोरदार तेजी
अर्थमंत्र्यांच्या या विश्वासपूर्ण विधानाचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी उसळी घेऊन ₹९१५ पर्यंत पोहोचले. परादीप फॉस्फेट्सचे शेअर्सही जवळपास ७ टक्क्यांनी वाढून ₹१६५ वर व्यवहार करताना दिसले.
याशिवाय, चंबल फर्टिलायझर्स, मद्रास फर्टिलायझर्स, आरसीएफ आणि नॅशनल फर्टिलायझर्सच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्समध्ये सुमारे २ टक्क्यांची आणि कोरमंडल इंटरनॅशनलमध्ये जवळपास १ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. एकूणच, सरकारच्या या विधानामुळे शेतकऱ्यांसोबतच गुंतवणूकदारांनाही दिलासा मिळाला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
