Multibagger Stock: NBFC स्टॉक टीसीआय फायनान्स (TCI Finance) सध्या शेअर बाजारात चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. सोमवार, २२ डिसेंबर रोजी देखील या स्टॅाकला १०% चं अपर सर्किट लागलं आणि त्याची किंमत १९.५० रुपयांपर्यंत पोहोचली. शेअरने अपर सर्किट गाठण्याची ही सलग चौथी वेळ आहे. यापूर्वी १७ आणि १८ डिसेंबर रोजी स्टॉकला २०% चं सर्किट लागले होतं, त्यानंतर एक्सचेंजने सर्किट मर्यादा कमी करून १०% केली. असं असूनही शेअरचा वेग कमी झाला नाही आणि अवघ्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये यात सुमारे ७४% वाढ नोंदवण्यात आली आहे.
महिन्याभरात ७५ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ
या तेजीमुळे डिसेंबर महिन्यात आतापर्यंत हा स्टॉक सुमारे ७५% वधारला आहे. जर महिन्याच्या अखेरीपर्यंत हाच वेग कायम राहिला, तर जून २०२४ नंतरची ही सर्वात मोठी मासिक तेजी ठरेल, जेव्हा शेअरनं सुमारे १२०% ची झेप घेतली होती. विशेष म्हणजे, या वाढीमागे कोणतेही मोठे फंडामेंटल कारण किंवा अधिकृत बातमी समोर आलेली नाही. बाजार तज्ज्ञांच्या मते, ही तेजी प्रामुख्यानं तांत्रिक घटक आणि शॉर्ट-कव्हरिंगमुळे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे या स्टॉकचा समावेश डिसेंबरमधील 'टॉप परफॉर्मिंग' स्टॉक्समध्ये झाला आहे.
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
कंपनीकडून स्पष्टीकरण
शेअरमधील ही असामान्य वाढ पाहून स्टॉक एक्सचेंजनं कंपनीकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. याला उत्तर देताना टीसीआय फायनान्सने २० डिसेंबर रोजी सांगितलं की, कंपनीकडे अशी कोणतीही महत्त्वाची किंवा किमतीवर परिणाम करणारी माहिती नाही, जी नियमांनुसार एक्सचेंजला सांगणं बंधनकारक आहे. कंपनीनं स्पष्ट केलं की, ते सेबी (SEBI) LODR नियमांचे पूर्णपणे पालन करत आहेत आणि गुंतवणूकदारांवर परिणाम करू शकणारी कोणतीही माहिती वेळेवर शेअर केली जाते. दरम्यान, कोणतीही महत्त्वाची माहिती थांबवून अथवा लपवलेली नसल्याचंही कंपनीनं म्हटलं.
कंपनीचा व्यवसाय
डिसेंबरमधील या रॅलीनं स्टॉकचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला तोट्यात असलेला हा शेअर आता 'YTD' आधारावर सुमारे ५% वाढीसह व्यवहार करत आहे. इतकंच नाही तर, गेल्या १२ महिन्यांतील तोटा अवघ्या चार दिवसांत भरून काढल्यामुळे ही २०२५ मधील एक मोठी 'टर्नअराउंड स्टोरी' म्हणून समोर आली आहे. टीसीआय फायनान्स ही आरबीआय नोंदणीकृत NBFC कंपनी असून ती सिक्युरिटीजच्या बदल्यात कर्ज आणि व्यावसायिक वाहन कर्ज देण्याच काम करते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
