RIL Share Price: मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण नोंदवण्यात आली. शेअरचा भाव मागील बंद भाव १,५७७.४५ रुपयांवरून घसरून दिवसाच्या नीचांकी १,४९७.०५ रुपयांपर्यंत खाली आला, जी सुमारे ५ टक्क्यांची घसरण आहे. जून २०२४ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. सत्राच्या सुरुवातीला शेअर १,५७५.५५ रुपयांवर किरकोळ घसरणीसह उघडला, मात्र त्यानंतर सततच्या विक्रीमुळे तो गडगडला. या घसरणीमुळे रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
घसरणीचं नेमकं कारण काय?
रिलायन्सने स्पष्ट केलं आहे की, जानेवारी महिन्यात रशियन कच्च्या तेलाचा कोणताही पुरवठा होण्याची अपेक्षा नाही आणि गेल्या तीन आठवड्यांत कोणताही माल प्राप्त झालेला नाही. रिलायन्स, जी रशियन तेलाची भारतातील सर्वात मोठी खरेदीदार होती, तिनं 'ब्लूमबर्ग'चा अहवाल फेटाळत एक निवेदन प्रसिद्ध केलंय. या अहवालात दावा करण्यात आला होता की, रशियन तेलानं भरलेली तीन जहाजं जामनगर रिफायनरीच्या दिशेने येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांनी इशारा दिला होता की भारताने रशियन तेलाची खरेदी कमी न केल्यास त्यांच्यावर शुल्क वाढवलं जाऊ शकतं.
बाजारातील कामगिरी
रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकूण व्यवहार ५.२१ लाख शेअर्सचा झाला असून उलाढाल ७९.४ कोटी रुपयांहून अधिक राहिली, जे बाजारातील वाढलेला सहभाग दर्शवते. निफ्टी ५० निर्देशांकावर या शेअरचा सर्वाधिक दबाव राहिला. निर्देशांकाच्या एकूण ९१ अंकांच्या घसरणीमध्ये एकट्या रिलायन्सचा वाटा ७२.५ अंकांचा होता. एचडीएफसी बँक आणि ट्रेंट यांनीही निर्देशांकातील घसरण वाढवण्यास हातभार लावला. सकाळी ११:३० च्या सुमारास निफ्टी ५० निर्देशांक ९७ अंकांच्या (०.३७%) घसरणीसह २६,१५३ वर व्यवहार करत होता.
शेअर किंमतीचा कल
रिलायन्सच्या शेअरच्या किमतीत अलीकडे संमिश्र कल दिसून आला आहे. गेल्या एका आठवड्यात शेअर ०.५४ टक्क्यांनी घसरला आहे, तर गेल्या दोन आठवड्यांत तो २.४४ टक्क्यांनी खाली आला आहे. मासिक स्तरावर हा शेअर ०.५५ टक्क्यांनी खाली आहे. मात्र, तिमाही आधारावर रिलायन्सनं ११.४५ टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली आहे, तर वार्षिक कामगिरी २५.८ टक्क्यांच्या वाढीसह मजबूत राहिली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
