शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणातही हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या शेअरनं मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी आपली मजबुती कायम ठेवली. व्यवहाराच्या सुरुवातीच्या तासांत या शेअरनं सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदवली. विशेष म्हणजे, शेअर्समध्ये तेजी असल्याचं हे सलग आठवं सत्र आहे. मंगळवारी व्यापाराच्या पहिल्या दोन तासांतच हिंदुस्थान कॉपरच्या सुमारे ७ कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली. दुपारी हा शेअर ५.६४ टक्क्यांच्या वाढीसह ५१४.९५ रुपयांवर व्यवहार करत होता. २०२५ या वर्षभरात हिंदुस्थान कॉपरच्या शेअर्सनी आतापर्यंत सुमारे ११० टक्क्यांचा परतावा दिला आहे.
जागतिक बाजारपेठेतील तांब्याच्या किमतींचा आधार
सोमवारी या शेअरनं ५४५.९५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला होता आणि ती तेजी मंगळवारीही कायम राहिली. तांब्याच्या जागतिक किमतीत झालेल्या वाढीमुळे सोमवारी एप्रिल २०१० नंतरची सर्वात मोठी एका दिवसातील उसळी पाहायला मिळाली. लंडन मेटल एक्सचेंजवर तांब्याचे दर आता विक्रमी स्तर ओलांडून १३,००० डॉलर प्रति टनच्या आसपास पोहोचले आहेत.
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्याची कमतरता, अमेरिकन आर्थिक आकडेवारीतील सुधारणा, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आणि डॉलर कमकुवत होणं ही या दरवाढीची प्रमुख जागतिक कारणं आहेत. कमकुवत डॉलरमुळे इतर चलन असलेल्या देशांसाठी तांबे स्वस्त होते, परिणामी त्याची मागणी वाढते. याचंच प्रतिबिंब भारताच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही (MCX) उमटलं असून तिथे तांब्याचे वायदे नव्या विक्रमी पातळीवर पोहोचलेत.
कंपनीचे बाजार भांडवल आणि सरकारी भागीदारी
मंगळवारी इंट्राडे व्यवहारादरम्यान हिंदुस्थान कॉपरच्या शेअर्सनी गेल्या आठ सत्रांतील रॅलीमध्ये एकूण ४० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप आता ५०,००० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचलंय. सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीअखेर या सार्वजनिक उपक्रमात सरकारचा ६६.१४ टक्के हिस्सा होता. किरकोळ गुंतवणूकदारांची (ज्यांचे भागभांडवल २ लाख रुपयांपर्यंत आहे) एकूण संख्या ६.३ लाखांहून अधिक असून त्यांच्याकडे एकत्रितपणे १४.५ टक्के हिस्सा आहे.
एलआयसी आणि म्युच्युअल फंड्सची स्थिती
म्युच्युअल फंड्सची या कंपनीतील भागीदारी नगण्य असली तरी, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) कंपनीत ४ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. या हिस्स्याचं सध्याचं बाजारमूल्य २,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जागतिक संकेतांमुळे हिंदुस्थान कॉपरमधील ही तेजी येणाऱ्या काळातही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
