Meesho Share Price : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'मीशो'च्या गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत खडतर ठरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मीशोच्या शेअर्सला ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागले असून, अवघ्या महिनाभरात गुंतवणूकदारांचे सुमारे ४० हजार कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. कंपनीच्या बिझनेस जनरल मॅनेजर मेघा अग्रवाल यांनी दिलेला राजीनामा आणि २,००० कोटींच्या शेअर्सचा 'लॉक-इन' कालावधी संपणे, ही या पडझडीची मुख्य कारणे मानली जात आहेत.
विक्रमी उच्चांकावरून ३५ टक्क्यांची घसरण
आज बीएसईवर मीशोचा शेअर १६४.५५ रुपयांच्या नीचांकी स्तरावर स्थिरावला. १८ डिसेंबर रोजी या शेअरने २५४.६५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, तिथून अवघ्या काही दिवसांतच शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, १११ रुपयांच्या आयपीओ किमतीवर लिस्ट झालेल्या या शेअरने ४६ टक्के प्रीमियमसह बाजारात एन्ट्री केली होती.
'लॉक-इन' संपल्याचा दबाव
नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या अहवालानुसार, मीशोच्या सुमारे १०.९९ कोटी (२% इक्विटी) शेअर्सचा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी संपला आहे. ६ जानेवारीच्या भावानुसार या शेअर्सचे मूल्य २,००३ कोटी रुपये आहे. लॉक-इन संपल्यामुळे बाजारात शेअर्सचा पुरवठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली.
वरिष्ठ पातळीवर राजीनामा
शेअर्समध्ये घसरण सुरू असतानाच, कंपनीच्या जनरल मॅनेजर (बिझनेस) आणि वरिष्ठ व्यवस्थापन समितीच्या सदस्या मेघा अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने एक्स्चेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली असून, या बातमीमुळे गुंतवणूकदारांचा उरलासुरला आत्मविश्वासही डळमळीत झाला.
ऑपरेशनल सुधारणा पण व्हॅल्युएशनचे आव्हान
बोनान्झाचे रिसर्च ॲनलिस्ट अभिनव तिवारी यांच्या मते, मीशोच्या मूलभूत व्यवसायात काही सकारात्मक सुधारणा झाल्या आहेत. प्रति ऑर्डर खर्च ५५ रुपयांवरून ४६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. कंपनीच्या स्वतःच्या लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्ममुळे डिलिव्हरी क्षमता वाढली आहे. ९० टक्क्यांवरून ही मर्यादा आता ६१ टक्क्यांवर आली आहे, ज्यामुळे डिलिव्हरी अपयशाचे प्रमाण घटले.
वाचा - जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
मात्र, या सुधारणांनंतरही इतर इंटरनेट कंपन्यांच्या तुलनेत मीशोचे 'हाय व्हॅल्युएशन' चिंतेचा विषय ठरत असून, त्यामुळेच नफेखोरीचा दबाव वाढला आहे.
