Meesho IPO : नुकतेच एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बाजारात लिस्ट झाली. एलजीच्या आयपीओने गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांहून अधिक नफा दिला. जर तुमची संधी हुकली असेल तर आता आणखी एक संधी चालून आली आहे. देशातील ऑनलाइन शॉपिंगच्या जगात आपले स्थान मजबूत करणारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो आता थेट शेअर बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने नुकतेच आपले अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस बाजार नियामक सेबीकडे जमा केले होते आणि त्याला मंजुरीही मिळाली आहे. या मंजुरीमुळे, मीशो आता 'मेनबोर्ड लिस्टिंग' साठी पूर्णपणे तयार आहे.
झोमेटो आणि झेप्टो सारख्या यूनिकॉर्न कंपन्यांच्या यादीत मीशोचाही समावेश आहे. यूनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्ट-अप कंपनीचे बाजार मूल्य १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त असते.
IPO चा आकार आणि वापर
मीशोच्या आयपीओचा एकूण आकार ६,५०० ते ७,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनी या माध्यमातून दोन प्रकारे निधी उभारत आहे.
१. फ्रेश शेअर : कंपनी स्वतः नवीन शेअर्स जारी करून सुमारे ४,२५० कोटी रुपये इतका निधी जमा करेल.
२. ऑफर फॉर सेल : या माध्यमातून जुने गुंतवणूकदार २,२०० ते २,६०० कोटी रुपये किमतीचे आपले शेअर्स विकतील.
आयपीओद्वारे जमा झालेला हा निधी कंपनी ब्रँडिंग, कॉर्पोरेट गरजा आणि तंत्रज्ञानाशी संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे.
जुने गुंतवणूकदार बाहेर पडणार
सेबीच्या अपडेटेड प्रॉस्पेक्टसनुसार, बंगळूरूस्थित मीशोच्या आयपीओमध्ये एलिवेशन कॅपिटल ही कंपनी ऑफर फॉर सेलविंडोद्वारे सर्वात मोठा हिस्सा विकणार आहे. त्यांच्यासोबत पीक XV पार्टनर्स आणि वेंचर हायवे हे जुने गुंतवणूकदारही आपले शेअर्स विकून बाहेर पडतील. विशेष म्हणजे, कंपनीचे प्रमोटर विदित आत्रे आणि संजीव बरनवाल हे देखील ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून काही प्रमाणात शेअर्स विकणार आहेत.
पुढील ३० ते ३५ दिवसांमध्ये 'बुक बिल्डिंग'ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपला आयपीओ बाजारात आणेल आणि शेअर्सचे मूल्य निश्चित करेल.
मीशोच्या नफ्या-तोट्याची स्थिती
- २०१५ मध्ये सुरू झालेल्या मीशो कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ७,६१५ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता, परंतु याच वर्षात कंपनीला ३०५ कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.
- मीशोने आपले मुख्यालय अमेरिकेच्या डेलवेअरमधून भारतात स्थलांतरित केले. या स्थलांतराच्या खर्चामुळे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मीशोचा निव्वळ तोटा वाढून ३,९४१ कोटी रुपयेपर्यंत पोहोचला.
- आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत मीशोला २८९ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे.
वाचा - या दिवाळीला बायकोसोबत पोस्ट ऑफिसच्या योजनेत करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळेल फिक्स व्याज
या आयपीओद्वारे मोठा निधी उभारल्यास कंपनीला आपला तोटा कमी करण्यात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास बरीच मदत मिळू शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)