PSU Stock Price : वर्ष २०२४ च्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. निफ्टीनं पुन्हा एकदा २३५०० ची महत्त्वपूर्ण सपोर्ट लेव्हल टेस्ट केली. या काळात बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये अशा बातम्या येत आहेत, ज्याचे रिफ्लेक्शन स्टॉकच्या प्राईजमध्ये दिसून येत आहे.
लार्जकॅप पीएसयू स्टॉक माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या शेअरच्या (Mazagon Dock Shipbuilders Ltd) किंमतीत मंगळवारी ओपनिंग बेलसह ४% वाढ झाली. माझगाव डॉक शिपयार्डचा शेअर २,३२० रुपयांवर उघडला आणि २,३६९.९५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. या डिफेन्स पीएसयू शेअरचे मार्केट कॅप ९० हजार कोटी रुपये आहे. नुकताच हा शेअर स्प्लिट झाला होता.
२०२४ च्या सुरुवातीला डिफेन्स पीएसयू शेअर्समध्ये बरीच तेजी होती. माझगाव डॉकमध्ये गुंतवणूकदार कॅलेंडर वर्षाच्या आधारावर नफा कमावत असले आणि हा शेअर वर्षभरात ९५ टक्के परताव्यावर असला तरी जुलै २०२४ मधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत तो ३५ टक्क्यांनी घसरला आहे.
अलीकडेच ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये अनेक ब्रोकरेज हाऊसेसनी माझगाव डॉकमध्ये विक्री करण्याचा सल्ला दिला होता. पण आता या शेअरमध्ये परिस्थिती बदलली आहे. कंपनीची ऑर्डर बुक वाढत आहे, अनेक डिफेन्स डील्स झाले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा या स्टॉककडे वळले आहेत. नव्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या बातमीनं माझगाव डॉकमध्ये मंगळवारी ४ टक्के वाढ दिसून आली. मात्र, बाजारातील नकारात्मक परिणामामुळे शेअरमध्ये उच्चांकी पातळीवरून नफावसुलीही झाली.
नव्या डिफेन्स डीलवर स्वाक्षरी
संरक्षण मंत्रालयाने मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि नेव्हल ग्रुप फ्रान्स सोबत २,८६७ कोटी रुपयांच्या दोन मोठ्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर मंगळवारी बीएसईवर ४.६ टक्क्यांनी वधारून २,३७०.५० रुपयांच्या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन आणि इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉरपीडो (ईएचडब्ल्यूटी) प्रणालीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांची, विशेषत: कलवरी श्रेणीची क्षमता वाढवणं हे या करारांचं उद्दीष्ट आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)