Ketan Parekh News Update : ब्रोकर केतन पारेख शेअर बाजारात पुन्हा एकदा अॅक्टीव झाला आहे. वास्तविक, बाजार नियामक सेबीने फ्रंट-रनिंग नावाचा नवीन घोटाळा उघडकीस आणला आहे. याचा मास्टर माईंड केतन पारेख असल्याचा संशय आहे. साल २००० मध्ये एका शेअर बाजार घोटाळ्यात पारेखला जेलची हवा खावी लागली होती. त्यानंतर त्याला १४ वर्षांसाठी रोखे बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता तो पुन्हा सक्रीय झाला असून नव्या पद्धतीने मार्केटमध्ये पैसा लावत आल्याचे समोर आलं आहे.
ब्रोकर केतन पारेख हा पडद्यामागून आतल्या माहितीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये फेरफार करत होता. सेबीला याची कुणकुण लागताच त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. केतन पारेखच्या गुप्त नेटवर्कचा शोध लागला आणि पुरावे हाती येताच केतन पारेखला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा सहभाग घेण्यास बंदी घालण्यात आली. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. त्याच्याशी संबंधित संशयास्पद बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. २ जानेवारी रोजी सेबीच्या या आदेशाने शेअर बाजारात फ्रंट रनिंग नावाचा एक विचित्र घोटाळा उघडकीस आला आहे.
सन २००० मध्ये झालेल्या शेअर घोटाळ्यानंतर केतन पारेख बराच काळ तुरुंगात होता. त्यावेळीही त्याला १४ वर्षांसाठी शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली होती. SEBI ने आपल्या २ जानेवारीच्या आदेशात सिंगापूरस्थित स्टॉक ट्रेडर रोहित साळगावकर यांना ट्रेडिंग करण्यास बंदी घातली आहे.
केतन पारीख असा करता होता फ्रंट रनिंग स्कॅम
सेबीने जारी केलेल्या १८८ पानांच्या आदेशात असे म्हटले आहे की, अमेरिकेतील एका मोठ्या फंड हाऊसचे व्यापारी भारतीय शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी रोहित साळगावकर याचा सल्ला घेत असत. अनेक गोपनीय माहितीही त्या लोकांनी रोहित साळगावकरसोबत शेअर केली होती. रोहित साळगावकर ही माहिती केतन पारेख यांना पाठवत असे. या माहितीचा वापर केतन पारीख काही काउंटर पार्टीसाठी करून पैसे कमवत असे. यासाठी त्याने एक फ्रंट रनर नेटवर्क तयार केले होते, ज्यामध्ये शेअर ब्रोकर्स किंवा त्यांचे कर्मचारी होते. यामध्ये शेअर खरेदी करण्याची रणनिती आखली जात होती.
रोहित साळगावकर याने पाठवलेली माहिती गोपनीय असून ती कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध नव्हती. अशाप्रकारे हे लोक कोणत्याही कंपनी किंवा स्टॉक ट्रेडरच्या गुप्त योजना अगोदर जाणून घेऊन भरपूर पैसे कमवत होते.