गेल्या काही काळापासून श्रीराम फायनान्स या NBFC कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहेत. या मजबूत वाढीमुळे अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास तीनपट झाले आहेत. दरम्यान, जपानच्या आघाडीच्या बँकिंग समूहाने या कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याने शेअरने आता नवा ऑल-टाइम हाय गाठला आहे.
शुक्रवारी बीएसईवर श्रीराम फायनान्सचा शेअर 3.71% वाढीसह ₹901.70 प्रति शेअरवर व्यवहार करत होते. इंट्राडे व्यवहारात शेअरने ₹913.50 चा 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला. कंपनीच्या बोर्डाने जपानी बँकेला हिस्सेदारी अधिग्रहणाची मंजुरी दिल्यानंतर शेअरमध्ये ही जोरदार उसळी पाहायला मिळाली.
MUFG कडून ₹39,618 कोटींची गुंतवणूक
जपानची आघाडीची बँक Mitsubishi UFJ Financial Group (MUFG) ने श्रीराम फायनान्समध्ये ₹39,618 कोटी (सुमारे 4.4 अब्ज अमेरिकन डॉलर) गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीद्वारे MUFG ने कंपनीतील 20% हिस्सेदारी विकत घेतली आहे. ही गुंतवणूक भारतातील कोणत्याही फायनान्स कंपनीतील सर्वात मोठ्या थेट परदेशी गुंतवणुकांपैकी एक मानली जात आहे.
₹840.93 दराने शेअर्स जारी
एक्सचेंज फाइलिंगनुसार, श्रीराम फायनान्स ₹840.93 प्रति शेअर या दराने 47.11 कोटींपेक्षा अधिक इक्विटी शेअर्स प्रेफरेंशियल इश्यूद्वारे जारी करणार आहे. या इश्यूनंतर डायल्यूटेड आधारावर MUFG ची हिस्सेदारी 20% इतकी राहील.
‘कंपनीसाठी निर्णायक क्षण’
श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष उमेश रेवनकर यांनी या व्यवहाराला कंपनीसाठी एक ‘निर्णायक क्षण’ असे म्हटले. MUFG चा प्रमुख गुंतवणूकदार म्हणून प्रवेश कंपनीच्या दीर्घकालीन विकास क्षमतेला बळ देईल. यामुळे भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.
MUFG साठी भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक
सुमारे 130 वर्षे जुनी असलेल्या MUFG बँकेसाठी ही भारतामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. MUFG चे ग्रुप CEO हिरोनोरी कामेजावा यांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांचे दीर्घकालीन दृष्टीकोन आणि मूलभूत मूल्ये समान आहेत, जे श्रीराम फायनान्सच्या वाढीच्या उद्दिष्टांना पाठबळ देतात.
शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल
श्रीराम फायनान्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.
3 वर्षांत वाढ : 227%
1 वर्षात वाढ : 57%
3 महिन्यांत वाढ : 42%
शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक ₹493.35 असून, कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ₹1,63,528 कोटी इतके आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
