IT Stocks Recovery : गेल्या काही दिवसांपासून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या धास्तीने कोलमडलेल्या भारतीय आयटी क्षेत्राला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक एआय कंपनी 'अँथ्रोपिक'ने आपल्या व्यावसायिक धोरणात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे गुंतवणूकदारांमधील भीती दूर झाली असून, बुधवारी टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंतची जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली.
काय होता तो 'अँथ्रोपिक शॉक'?
गेल्या आठवड्यात अँथ्रोपिकने त्यांच्या 'क्लाउड कोड टूल'ची घोषणा केली होती. हे टूल दशकानुदशके जुन्या 'कोबोल' लँग्वेज सिस्टीम्सना आधुनिक बनवू शकते, असा दावा करण्यात आला होता. भारतीय आयटी कंपन्या याच सिस्टीम्सच्या मेंटेनन्स आणि मॉडर्नायझेशनमधून अब्जावधी डॉलर्स कमावतात. एआयमुळे हे काम स्वस्त आणि जलद होणार असल्याने भारतीय इंजिनीअर्सची गरज संपेल, या भीतीने 'निफ्टी आयटी' निर्देशांक फेब्रुवारीत २० टक्क्यांनी कोसळला होता. २००८ नंतरची ही सर्वात मोठी घसरण होती.
अँथ्रोपिकची 'यू-टर्न' आणि नवीन भागीदारी
बुधवारी झालेल्या एका इव्हेंटमध्ये अँथ्रोपिकने स्पष्ट केले की, त्यांना सॉफ्टवेअर क्षेत्र संपवायचे नसून ते अधिक मजबूत करायचे आहे. अँथ्रोपिकने आता सेल्सफोर्स, गुगल, डॉक्यूसाइन आणि इनटुइट यांसारख्या मोठ्या 'SaaS' कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. अँथ्रोपिकचे 'क्लाउड कोवर्क' व्यासपीठ आता या टूल्ससोबत मिळून काम करणार आहे. यामुळे भारतीय आयटी कंपन्यांसाठी एआय हे संकट नसून सहकार्याची नवीन संधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन
जिओजीत इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, बाजारात आता सकारात्मक वारे वाहू लागले आहेत. फेब्रुवारीत परदेशी गुंतवणूकदार पुन्हा खरेदीदार बनले आहेत. आयटी स्टॉक्समधील विक्रीचा टप्पा आता संपत आला असून, अँथ्रोपिकच्या पार्टनरशिपच्या वृत्तामुळे भारतीय कंपन्यांसाठी नवीन संधींची दारे उघडतील. भारताची मजबूत अर्थव्यवस्था आणि कंपन्यांची वाढती कमाई यामुळे हा कल टिकून राहण्याची शक्यता आहे."
वाचा - २००८ सारख्या संकटाची पुनरावृत्ती? जेपी मॉर्गनच्या सीईओंचा धोक्याचा इशारा; गुंतवणूकदारांनी काय करावं?
तांत्रिकदृष्ट्या आयटी कंपन्या 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये
तांत्रिक विश्लेषणांनुसार, निफ्टी आयटी निर्देशांकातील १० पैकी ७ कंपन्या 'ओव्हरसोल्ड' (गरजेपेक्षा जास्त विक्री झालेल्या) झोनमध्ये पोहोचल्या होत्या. सध्या हा निर्देशांक गेल्या ८ वर्षांतील नीचांकी स्तरावर ट्रेड करत असल्याने खरेदीसाठी ही चांगली संधी मानली जात आहे. जेएम फायनान्शिअलच्या मते, इन्फोसिस आणि मिडकॅपमध्ये 'एमफॅसिस' यांसारख्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
