Iran Israel-America War Stock Market: अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. बाजार उघडताच सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स ९१४.१५ अंकांच्या जोरदार घसरणीसह ८०,३७३.०४ च्या पातळीवर आला. याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील २४६.४० अंकांच्या घसरणीसह २४,९३२.२५ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टॉप गेनर्स आणि टॉप लूझर स्टॉक्स
शेअर बाजारात आज सर्व सेक्टर इंडेक्स रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत, ज्यामध्ये रिअल्टी सेक्टरला २% घसरणीसह सर्वाधिक फटका बसलाय. इंटरग्लोब एव्हिएशन, लार्सन अँड टुब्रो, मारुति सुझुकी, एशियन पेंट्स आणि TMPV यांसारख्या प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, आजच्या 'टॉप गेनर्स'मध्ये ONGC, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंडाल्को यांचा समावेश आहे. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही १% च्या घसरणीसह कमकुवत कल दिसून येत आहे.
UAE मध्ये इराणच्या हल्ल्याचा फायदा घेत सायबर ठगांचा उच्छाद; लोकांच्या अकाऊंटमधून उडवताहेत पैसे
गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल
युद्धाच्या परिणामामुळे सोमवारी जागतिक बाजारापेठांमध्येही परिणाम दिसून आला. 'GIFT निफ्टी' सुमारे ११० अंकांनी घसरून २५,२३० च्या आसपास व्यवहार करताना दिसला, तर 'डाओ फ्युचर्स'मध्ये ३५० अंकांची घसरण आणि जपानच्या 'निक्केई' इंडेक्समध्ये सुमारे ६०० अंकांची कमजोरी नोंदवली गेली. इराणच्या हल्ल्यानंतर युएईमधील शेअर बाजार दोन दिवसांसाठी बंद ठेवावे लागले आहेत. दुसरीकडे, गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्तांकडे आपला मोर्चा वळवला आहे, ज्यामुळे 'कॉमेक्स'वर सोन्याच्या दरात सुमारे १३५ डॉलरची मोठी वाढ झाली असून भाव ५,३८० च्या वर पोहोचलेत. चांदी देखील सुमारे ३% वधारून ९६ डॉलरच्या पार गेली आहे.
