Share Market India: शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रामाणात चढ-उतार दिसून येत आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संकटामुळे भारताचा 'वोलेटिलिटी इंडेक्स' म्हणजेच इंडिया VIX अतिशय वेगानं वर गेलाय. इंडिया VIX बाजारातील भीती आणि अनिश्चितता मोजतो. जसा हा निर्देशांक वाढतो, त्याचा अर्थ गुंतवणूकदार अधिक घाबरलेले आहेत आणि बाजारात मोठ्या हालचालींची अपेक्षा करत आहेत.
गेल्या दोन सत्रांमध्ये इंडिया VIX ५० टक्क्यांहून अधिक उसळलाय. बुधवारी तो २१.१४ वर बंद झाला, जो मागील बंदच्या तुलनेत २३.४ टक्क्यांनी वर होता. त्यापूर्वी सोमवारी देखील यात २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. एकूणच दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली. ही पातळी शेवटची मे २०२५ मध्ये दिसून आली होती. सध्या तो २१.१४ च्या आसपास असून ही पातळी बरीच वरची मानली जाते. सामान्यतः जेव्हा इंडिया VIX २० च्या वर जातो, तेव्हा बाजारात मोठी घसरण किंवा चढ-उतार होण्याची दाट शक्यता असते.
मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आता जमीनीवर, किंमतीत मोठी घसरण; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
इंडिया VIX का उसळला?
याचं मुख्य कारण म्हणजे मिडल ईस्टचं संकट. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणनं प्रत्युत्तराची कारवाई केली आणि संपूर्ण भागात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वेगानं वाढल्या कारण जगातील कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा मध्ये पूर्वेतून येतो. भारतालाही ५५ टक्क्यांहून अधिक कच्चं तेल इथूनच मिळतं, त्यामुळे येथे परिणाम जास्त जाणवतो. तेल महाग झाल्यामुळे महागाई वाढू शकते, कंपन्यांचा खर्च वाढतो आणि अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होतो.
या संकटामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सेन्सेक्स ८०,००० च्या खाली बंद झाला आणि निफ्टी २४,५०० च्या खाली आला. एका दिवसात सेन्सेक्स १,७०० अंकांनी घसरला होता आणि निफ्टी २४,४०० च्या खाली गेला होता. रुपयाही डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता आणि त्यानं ९२ चा टप्पा ओलांडला होता. गोल्ड ETF मध्येही घसरण झाली, तर जागतिक बाजारात सोनं तेजीत होतं. विदेशी गुंतवणूकदारही पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे बाजारावर अधिक दबाव येत आहे.
बाजार पुढेही पडणार का?
'मनीकंट्रोल'च्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचं असे मत आहे की सध्या बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. हा तणाव किती दिवस चालेल यावर सर्व काही अवलंबून आहे. जर संकट लवकर संपलं आणि तेलाच्या किमती स्थिर झाल्या तर बाजार सावरू शकतो. परंतु हे संकट लांबलं तर अधिक घसरण होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण, जागतिक मंदी आणि आता हे युद्ध यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. इंडिया VIX वर्षाच्या सुरुवातीपासूनच खूप वर चढला आहे. गुंतवणूकदारांसाठी ही वेळ सावधगिरीची आहे. ज्यांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांनी घाबरू नये, मात्र नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करावी. मोठ्या घसरणीनंतर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त मिळू शकतात, पण त्यात जोखीमही जास्त आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
