लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील उच्च मूल्यांकन असताना मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २०२६ वर्षाच्या अखेरपर्यंत ९३,९१८ अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचू शकतो. सेन्सेक्समध्ये पुढील दोन वर्षांत सुमारे ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज प्रसिद्ध मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ‘क्लाइंट एसोसिएट्स’ने वर्तवला आहे.
यापुढे बाजारात सरसकट तेजी नसून, मूलभूत पाया भक्कम असलेल्या निवडक शेअर्समध्येच कमाईची संधी मिळणार आहे.
सोने-चांदीने केले सुरक्षित
वार्षिक इक्विटी अहवालानुसार, भारताची मजबूत अर्थव्यवस्था आणि कंपन्यांच्या उत्पन्नातील सुधारणा यामुळे ही वाढ शक्य होणार आहे. २०२५ मध्ये सोन्या-चांदीच्या किमतींनी मोठी झेप घेतली. तणाव, कमकुवत डॉलर, बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी यामुळे २०२६ मध्येही सोने-चांदी पोर्टफोलिओसाठी सुरक्षित कवच ठरतील.
३,०७८ अंकांवर सेन्सेक्स १७ सप्टेंबर २००२ मध्ये होता. सध्या तो ८४,९६१ अंकांवर आहे. २००२ ते २०२६ दरम्यान सेन्सेक्समध्ये तब्बल २,५२५ टक्के वाढ झाली आहे.
सेन्सेक्समध्ये वाढ कशी ?
| कालावधी | अंकांनी वाढ | टक्केवारी (%) |
| ५ वर्षांत | ३६,४४३ | ७५.१०% |
| ३ वर्षांत | २४,८२० | ४१.२७% |
| १ वर्षात | ६,९४८ | ८.९१% |
| ६ महिन्यांत | १,५६९ | १.८८% |
| ३ महिन्यांत | ३,०८४ | ३.७७% |
| १ महिन्यात | ६५९ | -०.८८% |
