PSU Bank Stocks HMPV china: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. मेटल, मीडिया आणि पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानं शेअर बाजार जोरदार आपटला. चीनमध्ये श्वसनाचे आजार वाढण्यास कारणीभूत असलेल्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे (HMPV) दोन रुग्ण सोमवारी बंगळुरूमध्ये आढळले. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येत आहे. पीएसयू बँक निर्देशांकामध्ये यानंतर मोठी घसरण दिसून आली. निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक घसरला. त्याचे सर्व १२ शेअर्स रेड झोनमध्ये होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
पीएसयू बँक निर्देशांकात युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वाधिक घसरले. डिसेंबर तिमाहीतील व्यवसायाच्या अपडेट नोंदवल्यानंतर त्यात ८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. युनियन बँकेनं डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर ठेवींमध्ये ३.८ टक्के वाढ नोंदविली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत अॅडव्हान्स्डमध्ये ५.९ टक्के वाढ झाली आहे. क्रमिक आधारावर ठेवी २ टक्क्यांनी घसरल्या, तर कर्जात २.१ टक्क्यांनी वाढ झाली.
शुक्रवारी संध्याकाळी बिझनेस अपडेट नोंदविणारी दुसरी पीएसयू बँक बँक ऑफ बडोदा आहे, जिथे ठेवींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ११.८% वाढ झाली आहे. तर, कर्जात तेवढ्याच प्रमाणात ११.६ टक्के वाढ झाली. पीएसयू बँक निर्देशांकात बँक ऑफ बडोदाचे शेअर्स दुसऱ्या क्रमांकाचे खराब कामगिरी करणारे आहेत, यामध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
या शेअर्समध्येही घसरण
त्याखालोखाल कॅनरा बँकेचे शेअर्स ३.३९ टक्क्यांनी घसरले आहेत. बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पीएनबी ३.३६ टक्क्यांनी घसरले. तर युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयओबी, इंडियन बँक यांचेही शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक घसरले. पंजाब सिंध बँक आणि एसबीआयचे शेअरही रेड झोनमध्ये आलेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)