Exato Technologies Stock: एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्सनी लिस्टिंगवरही कमाल केली आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएईसईवर ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह २६६ रुपये प्रति शेअर दरानं लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीचे शेअर्स आणखी ५ टक्क्यांनी वाढून २७९.३० रुपये प्रति शेअरवर पोहोचले. आयपीओमध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरचा किंमत बँड १४० रुपये होता. याचा अर्थ, आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत एक्साटो टेक्नॉलॉजीजचे शेअर्स पहिल्याच दिवशी १०० टक्क्यांनी वाढले आहेत.
विजय केडिया यांचाही कंपनीत मोठा वाटा
दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांचाही एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये मोठी गुंतवणूक आहे. कंपनीत विजय केडिया यांची ४.५ टक्के भागीदारी आहे. एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा एकूण आकार ३७.४५ कोटी रुपये इतका होता.
२०१६ मध्ये एक्साटो टेक्नॉलॉजीजची सुरुवात झाली होती. एक्साटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक कस्टमर ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर असून, ती टेक-आधारित सोल्युशन्स उपलब्ध करते. ही सोल्युशन्स कस्टमर एंगेजमेंट्स आणि ऑपरेशनल इफिशिएंसी वाढवतात. एक्साटो टेक्नॉलॉजीज सीएक्स ॲन्ड ॲनॅलिटिक्स, यूनिफाइड कम्युनिकेशन्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्साटो आयक्यू यासह अनेक प्रकारच्या सेवा ऑफर करते. कंपनी बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस ॲन्ड इन्शुरन्स, हेल्थकेअर, रिटेल, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांना आपल्या सेवा पुरवते.
आयपीओला ९४७ पटीहून अधिक सबस्क्रिप्शन
एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला एकूण ९४७.२१ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १०६८.७४ पट बोली लागली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १४८८.७२ पट सबस्क्रिप्शन मिळालं. क्वॉलीफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा ३२७.०८ पट सब्सक्राइब झाला.
एक्साटो टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठीच बोली लावू शकत होते. आयपीओच्या दोन लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये २,८०,००० रुपये इतकी गुंतवणूक करावी लागली. अपूर्व के सिन्हा आणि स्वाती सिन्हा हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी एक्साटो टेक्नॉलॉजीजमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी ७५.८५ टक्के होती, जी आता ५४.७३ टक्के राहिली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
