Tesla Share Price : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे सख्य साऱ्या जगाला माहिती आहे. ट्रम्प निवडून येण्यासाठी मस्क यांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता. ट्रम्प यांची सत्ता येताच मस्क यांना त्याचे फळ मिळाले. मंत्रिमंडळात मानाचं पान देत ट्रम्प यांनी मस्क यांना मंत्रीपदावर बसवलं. इकडे टेस्ला कंपनीचे शेअर्सनेही उसळी घेतली. त्यासोबत मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या जवळपासही कोणी नाही. मात्र, हे फार दिवस चालेल असं वाटत नाही. ट्रम्प यांच्या सोबतची जवळीक आता त्यांनाच महागात पडत आहे. मस्क यांच्या ऑटोमोबाईल कंपनीला या वर्षीच्या जानेवारीच्या अखेरीपासून सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. ट्रम्प यांनी मस्क यांना DOGE (Department of Government Efficiency) चे प्रमुख केले. एकीकडे ट्रम्प यांच्या आदेशानुसार मस्क अमेरिकन सरकारचा खर्च कमी करत असताना दुसरीकडे त्यांच्या कंपनी टेस्लाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. मात्र, ही बाब अमेरिकन नागरिकांना रुचली नाही. या आदेशाविरोधात लोक टेस्लाच्या शोरुमबाहेर आंदोलन करत आहेत. एकेठिकाणी तर शोरूमला आग लावण्याची घटनाही घडली.
इलॉन मस्क तिहेरी संकटात
नॅस्डॅक डेटानुसार, २१ जानेवारी ते ३ एप्रिल २०२५ पर्यंत टेस्लाच्या शेअरची किंमत ३६.९७ टक्क्यांनी (१५६.७९ डॉलर) घसरली आहे. एकीकडे, टेस्ला कारला चिनी कार इलेक्ट्रिक कंपनी बीवायडीकडून तगडी स्पर्धा मिळत आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे टेस्ला गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास होत आहे. ते त्यांचे स्टेक विकून कंपनीतून बाहेर पडत आहेत. अशा तिहेरी संकटात मस्क यांची टेस्ला कंपनी सापडली आहे.
वाचा - सोने ३६ हजार रुपयांनी स्वस्त होणार? अमेरिकन फर्म मॉर्निंगस्टारचा दावा; घरणीमागील कारणंही सांगितलं
अमेरिकन शेअर बाजारात वादळ
२ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाची घोषणा झाल्यापासून जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मात्र अमेरिकन शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच एकच खळबळ उडाली. गुरुवारी, नॅस्डॅकमध्ये सुमारे ६ टक्के, S&P ५०० मध्ये ४.८ टक्के, डो जॉन्समध्ये ४ टक्के इतकी मोठी घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन बाजारपेठेत आलेल्या या सुनामीमध्ये देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी टेस्ला, ॲमेझॉन, ॲपल, एनव्हीडिया, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.