Ather Energy IPO: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी लिमिटेडनं आपल्या कम्पलसरी कनव्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्सचं (CCPS) इक्विटीमध्ये रूपांतर करून बहुप्रतीक्षित आयपीओच्या (IPO) दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आयपीओच्या तयारीचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय.
कंपनीचा आयपीओ एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. पीटीआय भाषानं दिलेल्या वृत्तानुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (आरओसी) दाखल केलेल्या कागदपत्रांप्रमाणे, कंपनीच्या संचालक मंडळानं ८ मार्च २०२५ रोजी एक ठराव मंजूर केला. यात १.७३ कोटी थकित सीसीपीएसचं २४.०४ कोटी पूर्ण भरलेल्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली. एक रुपया फेस व्हॅल्यू असलेले हे शेअर्स सध्याच्या इक्विटी शेअर्सइतके असतील.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (ICDR) नियमांनुसार, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दस्तऐवज दाखल करण्यापूर्वी सर्व प्रेफरन्शिअल शेअर्सचं इक्विटीमध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे. यावरुन एथर एनर्जी आपल्या आयपीओच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं दिसून येतंय. जो आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लाँच होणाऱ्या पहिल्या आयपीओपैकी एक असू शकतो.
आयपीओबद्दल माहिती
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट उभारण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी एथर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मसुदा दाखल केला होता. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (DRHP) मसुद्यानुसार आयपीओमध्ये ३,१०० कोटी रुपयांचे नवे इश्यू जारी केले जातील. यामध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) २.२ कोटी इक्विटी शेअर्स ची विक्री करणार आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओनंतर सार्वजनिक होणारी ही दुसरी इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी असेल. ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओमध्ये ५,५०० कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि ८,४९,४१,९९७ इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे.