Groww IPO: डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रो (Groww) (बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड) ने आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओचा (IPO) प्राइस बँड प्रति शेअर ९५ ते १०० रुपये निश्चित केला आहे. पुढील वाढीच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. हा आयपीओ फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) मिळून आहे. यामुळे कंपनीला भांडवल मिळेल आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून अंशतः बाहेर पडण्याची संधी मिळेल. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू २ रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि गुंतवणूकदार किमान १५० शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावू शकतील.
ग्रे मार्केटमध्ये हालचाल
ग्रो आयपीओचा प्राइस बँड जाहीर होताच ग्रे मार्केटमध्ये (Grey Market) हालचाल सुरू झाली आहे. बाजार सूत्रांनुसार, ग्रो आयपीओचा जीएमपी (GMP) १०.५ रुपये आहे, जो कमाल किमतीपेक्षा १०.५ टक्के अधिक आहे.
आयपीओची साईज आणि ओएफएसची माहिती
या इश्यूचा एकूण आकार ६,६३२.३० कोटी रुपये आहे. आयपीओमध्ये एकूण १,०६० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, सध्याचे गुंतवणूकदार एकूण ५५,७२,३०,०५१ शेअर्स विकणार आहेत. पीक XV पार्टनर्स इन्वेस्टमेंट्स VI-१, वायसी होल्डिंग्स II, एलएलसी, रिबिट कॅपिटल V, एल.पी., जीडब्ल्यू-ई रिबिट ऑपर्चुनिटी V, एलएलसी, आणि इंटरनेट फंड VI प्रायव्हेट लिमिटेड यांसारखे सुरुवातीचे गुंतवणूकदार त्यांचा काही हिस्सा विकत आहेत. यावरून स्पष्ट होतं की कंपनी आता मोठ्या स्तरावर विस्तारासाठी सज्ज झाली आहे आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर नफा मिळवत आहेत.
महत्त्वाच्या तारखा आणि लिस्टिंगची योजना
ग्रो चा अँकर बुक ३ नोव्हेंबरपासून उघडेल, तर आयपीओ ४ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत खुला राहील. शेअर्सचं वाटप १० नोव्हेंबरच्या आसपास होईल आणि शेअर्स ११ नोव्हेंबरपर्यंत डिमॅट खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचा शेअर १२ नोव्हेंबरला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
आयपीओमध्ये कोणाचा किती हिस्सा
ग्रो चा आयपीओ बुक बिल्डिंग प्रोसेसवर आधारित असेल. एकूण ऑफरपैकी ७५ टक्के हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB), १५ टक्के हिस्सा नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) आणि १० टक्के हिस्सा रिटेल इन्व्हेस्टर्सना वाटप केला जाईल. यामुळे सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांना यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
लीड मॅनेजर्स आणि रजिस्ट्रार
या इश्यूच्या लीड बँकरांमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, ॲक्सिस कॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स यांचा समावेश आहे. तर, एमयूएफजी इंटाइम इंडिया (MUFG Intime India) रजिस्ट्रारची भूमिका पार पाडेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
