Share Market Today: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स एका क्षणी २,०८१.२३ अंकांच्या प्रचंड घसरणीसह ७४,८३७.६७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी देखील ६१८.८५ अंकांनी घसरून २३,८३१.०० च्या पातळीवर खाली आला.
सोमवारच्या सत्रात निफ्टीमधील मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले. सुरुवातीच्या व्यवहारात श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, एशियन पेंट्स, एल अँड टी आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टीमधील प्रमुख 'लूझर स्टॉक्स' राहिले, तर ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये मात्र वाढ दिसून आली.
बाजारातील पडझडीची प्रमुख कारणं
इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि जागतिक पुरवठ्याबाबत निर्माण झालेला धोका यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या वाढत्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार इक्विटीमधून आपले पैसे काढून घेत आहेत. रुपया कमकुवत होणं आणि तेलाच्या आयातीचा खर्च वाढण्याची भीती, ही देखील या घसरणीमागील महत्त्वाची कारणं आहेत. पीएसयू बँक इंडेक्समध्ये सुमारे ४ टक्क्यांची घसरण झाली असून, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही सुमारे ३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक सध्या रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत.
जागतिक बाजारपेठांमध्येही मोठी घसरण
केवळ भारतच नव्हे, तर जागतिक बाजारपेठांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. टोक्योच्या वेळेनुसार सकाळी १०:५० पर्यंतच्या अपडेटनुसार, S&P 500 फ्यूचर्समध्ये २.२% घसरण झाली आहे. जपानच्या निक्केई २२५ फ्यूचर्समध्ये (OSE) ७.४% ची प्रचंड घसरण नोंदवली गेली, तर टॉपिक्स इंडेक्स ५.८% खाली आला आहे. ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 ४.३%, हाँगकाँगचा हँग सेंग २.९% आणि शांघाय कंपोझिट १.३% नं घसरलेत. तसेच युरो स्टॉक्स ५० फ्यूचर्स २.८% ने घसरलेत.
मध्य पूर्वेतील संघर्ष, विशेषतः इराणशी संबंधित तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल १०० डॉलरचा टप्पा ओलांडल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर महागाई आणि आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच भीतीपोटी जगभरातील बाजारपेठांमध्येही विक्री पाहायला मिळतेय.
