china defence stocks : पाकिस्तानसोबतच्या लष्करी संघर्षादरम्यान, संपूर्ण जगाने भारतीय सैन्याची ताकद आणि देशाची संरक्षण व्यवस्था पाहिली. यामध्ये पाकिस्तानसोबतचीनचा बुरखाही फाटला. कारण, चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवली. पण, या चिनी शस्त्रास्त्रांनी मैदानात मार खाल्ला. याचा परिणाम आता चीनच्या शेअर बाजारातही पाहायला मिळत आहे. चीनच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे आजच्या व्यापार सत्रात, भारतीय संरक्षण कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात तेजीसह व्यवहार करत आहेत. चीनमधील काही प्रसिद्ध संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. यामध्ये सन क्रिएट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, जुझोउ होंगडा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे शेअर्स समाविष्ट आहेत.
युद्धात चीनची विमाने कोसळली आणि बाजारातील शेअर्स
भारतीय सैन्याने ओपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये ३-४ दिवस लष्करी संघर्ष सुरू होता. या काळात भारतीय सैन्याने एअरबेससह पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांचे मोठे नुकसान केले. यामध्ये चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमानांचाही समावेश होता. काल, लष्कराने पत्रकार परिषदेत सांगितले, की चीनने विकसित केलेले लांब पल्ल्याचे, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. युद्धात चिनी शस्त्रास्त्रांच्या अपयशामुळे त्यांची निर्मिती करणाऱ्या चिनी कंपन्यांची प्रतिष्ठा डागाळली आहे. त्याचा परिणाम शेअर्समधील घसरणीत दिसून येत आहे.
वाचा - म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
या चिनी शेअर्समध्ये मोठी घसरण
चीनमधील संरक्षण क्षेत्रातील कंपनी क्रिएट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, जुझोउ होंगडा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. क्रिएट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ही एक आघाडीची चिनी टेक कंपनी आहे. जी रडार सिस्टीम आणि इतर संरक्षण उत्पादने तयार करते. याशिवाय, आणखी एका चिनी संरक्षण कंपनी एविक एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स देखील २ टक्क्यांनी घसरले आहेत.